लाॅकडाऊनचे ओझे दूर सारत युवा शेतकऱ्याचा नवसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:07 AM2020-12-27T04:07:55+5:302020-12-27T04:07:55+5:30

उमरेड : स्वयंपाकात आणि औषधी गुणधर्म असलेल्या गुणकारी लसूणची लागवड करावी, असा विचारही या परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात डोकावत नाही. ...

Young farmer's resilience to carry the burden of lockdown | लाॅकडाऊनचे ओझे दूर सारत युवा शेतकऱ्याचा नवसंकल्प

लाॅकडाऊनचे ओझे दूर सारत युवा शेतकऱ्याचा नवसंकल्प

Next

उमरेड : स्वयंपाकात आणि औषधी गुणधर्म असलेल्या गुणकारी लसूणची लागवड करावी, असा विचारही या परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात डोकावत नाही. खर्च अधिक, सूक्ष्म नियोजन आणि परिश्रम अशा बाबी जुळून आल्या तरच या लागवडीचा विचार करणे संयुक्तिक ठरते. लॉकडाऊनमुळे तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बाजारात शेतमालाला भाव मिळाला नाही. अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा उमरेडच्या एका युवा शेतकऱ्याने लसूण लागवड करण्याची हिंमत केली. जैविक खताचा अधिकांश वापर करीत शेतातील लसूण आता बहरल्याचे चित्र नजरेस पडत आहे. उमरेडनजीक असलेल्या शिवापूर शिवारात केवळ पाव एकरात लसूण शेतीचा हा प्रयोग नितीन यादव राहाटे यांनी साकारला आहे. शेतातील हिरवळ बघितल्यानंतर यशस्वी होणार असल्याचे संकेत आहेत. नितीनने आधुनिक शेतीचा वसा जोपासत मेहनतीच्या बळावर लसूण लागवडीसाठी जीव लावला. अतिशय खर्चिक असलेले लसूणचे १०० किलो बियाणे खरेदी केले. यातूनही केवळ ६० किलो बियाणांची निवड करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात लागवड झाली. वेळोवेळी स्वत: तयार केलेल्या जैविक खताचा वापर या पिकांवर केल्या गेला. आता दोन महिन्यात उत्तम परिस्थितीत लसूण असल्याचे चित्र दिसून येत आहे. खर्च अधिक. मेहनत भरपूर असून या संपूर्ण नियोजनासाठी सुचित अवचट, भाऊराव वानखेडे, पुणे शहाणे, अतुल कुरेर्वार, ज्ञानेश्वर घरडे आदींचे सहकार्य मोलाचे ठरले असल्याची बाब नितीन राहाटे यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी लसूणचे क्षेत्र वाढविणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आता जैविक शेतीकडे वाटचाल करण्याची गरज असल्याचे मतही त्याने मांडले.

कांदाही बहरला

नितीनने दीड एकर क्षेत्रात कांद्याचीही लागवड केली. यामध्ये सुद्धा जैविक शेतीचा प्रयोग केला. वेळोवेळी खत, पाणी आणि फवारणीचे उत्तम नियोजन आखले. दीड एकरातील कांदा सुद्धा चांगलाच बहरल्याचा आनंद नितीनने व्यक्त केला.

Web Title: Young farmer's resilience to carry the burden of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.