तरुण पिढीसोबत तिच्या भाषेत बोललं गेलं पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:28 PM2018-10-20T12:28:23+5:302018-10-20T12:28:50+5:30
देशाच्या विकासाचे मॉडेल म्हणून आज आपण जे काही स्वीकारलं आहे ते गांधींच्या विचारांमध्ये न बसणारं आहे.
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर
महात्मा गांधींनी जो विचार मांडला त्यासमोर आज कुठली आव्हाने आहेत आणि आज त्या विचारांची किती उपयुक्तता आहे असा प्रश्न आहे. तर देशाच्या विकासाचे मॉडेल म्हणून आज आपण जे काही स्वीकारलं आहे ते गांधींच्या विचारांमध्ये न बसणारं आहे. हे मॉडेल आपण काही एका रात्रीत स्वीकारलेलं नाही. आपण हे विकासाचं मॉडेल जे स्वीकारलं आहे ते कसं असावं हे ठरवून काही लोक इथून गेलेत, देश सोडून गेलेत... त्यांनी जे विकासाचं मॉडेल ठरवलं होतं तेच आपण चालू ठेवलं. आपल्या देशासाठी विकासाचं जे मॉडेल आवश्यक होतं, ज्याची चर्चा हिंद स्वराजमध्ये आहे किंवा नंतरच्या सगळ्या १८४७ पासून म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळापासून १९४७ पर्यंत, म्हणजे महात्मा ते महात्मा यांच्या काळात या देशात जे विचारमंथन झालं, त्यातून देशासाठी विकासाचं मॉडेल जे साधारण १९२० च्या सुमारास पुढं आलं त्याला नाकारणारी जी आजची राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था रुजवली जात आहे, तेच गांधी विचारांसमोरचं खरं आव्हान आहे.
आपण सामाजिक समतेचा प्रश्न कधी समजून घेणार? मग आजच्या शिक्षण पद्धतीत काय प्रश्न आहेत ते शोधून कोण सोडवणार... गांधी विचार तुम्ही बाजूला ठेवा. पण या प्रश्नांची उत्तरं नाही सापडली तर उद्या या जगात हिंसेव्यतिरिक्त काही उरणार नाही असं वाटत नाही का तुम्हाला? बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न आहे. जी शिक्षण पद्धत बेरोजगारीचा फुगा दिवसेंदिवस फुगवते आहे, ती चालणार आहे का आपल्याला, आरोग्याची ही पद्धत योग्य आहे का सगळ््यांसाठी... आता जी पाण्याची व्यवस्था करत आहोत ती दीर्घकालीन आहे का? धरण भरलं तर शहरातले लोक खूष होतात. पण शेतकऱ्याचे काय? निसर्गाच्या असंतुलनाचे काय? विकासाच्या या मॉडेलमुळे निर्माण होणारे हे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पिढीसाठी सोडून देणार आहोत काय? हे सगळे प्रश्न तुमच्या-माझ्या नातवंडांना भेडसावणार आहेत. तुम्हीच विचार करा, तुम्हाला कसा विकास पाहिजे. त्याचा विचार केला की मग गांधी विचार आजच्या काळात संयुक्तिक आहे की नाही हे तुम्हाला कळेल.
मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी एका शिबिरासाठी जाणार होतो. सहज माझ्या नातवाला म्हटलं, तुझ्यासाठी काय आणू? तो म्हणाला काहीच नको. तुम्ही फार तर ते खादीचे शर्ट किंवा कुडते आणाल.
मी म्हटलं ठीक आहे. तू एक सांग आपल्या जगातलं पाणी वाचणं महत्त्वाचं वाटतं का तुला? माझा नातू हो म्हणाला. मी म्हटलं, खादीसाठी किती पाणी लागतं आणि तू जे वापरतोस ते सिंथेटिक कपडे वापरतो त्याच्या उत्पादनासाठी किती पाणी लागतं हे तुला पाहता येईल का? तू गुगल सर्च करून पाहा. शिवाय मोठमोठ्या कापड कारखान्यांमधील वेस्ट हे आपण नद्यांमध्ये सोडतो. केमिकल वेस्टमुळे होणारी हानी आपण नेहमी वाचतच असतो. माझा नातू विचारात पडला.मग म्हणाला, दादा, आप मेरे लिये दो ड्रेस जरुर लाना... त्यामुळे मला असं वाटतं, की नुसतं गांधी विचार, विनोबा विचार असे न सांगता, तरुण पिढीच्या भाषेत त्यांना सांगितले गेले तर ते अधिक रुजतील व स्वीकारले जातील.