एसटीत अंधारात तरुणीला छेडले; मजनूला चोपले, बस थेट ठाण्यात !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:15 AM2023-10-14T11:15:54+5:302023-10-14T11:26:26+5:30
उमरेडची घटना : पोलिसांनी मजनूला खिलवली कोठडीची हवा
उमरेड (जि. नागपूर) : बसमधील अंधाराचा गैरफायदा घेत बाजूला बसलेल्या तरुणाने मजनूगिरी सुरू केली. त्यामुळे पीडित तरुणीने आरडाओरड केली. परिणामी सहप्रवाशांनी घडलेला प्रकार जाणून घेत मजनूगिरी करणाऱ्या तरुणाला चोप दिला. तर, चालक-वाहकांनी थेट पोलिस ठाण्यात बस नेल्यामुळे पोलिसांनी नंतर त्याला कोठडीची हवा दाखवली.
धावत्या बसमध्ये तरुणीशी लगट करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव दिनेश केवलराम बालबुद्धे (वय २९) आहे. तो कावरापेठ उमरेड येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास नागपूरकडे येणाऱ्या बसमध्ये वेकोली उमरेड बसस्थानकावरून एक तरुणी बसली. तिच्या बाजूलाच आरोपी दिनेश बसला होता. बस सुरू होताच त्याच्यातील मजनू जागा झाला.
प्रारंभी तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर मात्र तिने प्रतिकार करून आरडाओरड केली. परिणामी बाजूच्या प्रवाशांनी तरुणीकडे विचारणा केली. तिने विनयभंगाची माहिती देताच प्रवाशांनी दिनेशला चोपून काढले. तर, त्याला धडा शिकविण्यासाठी बसच्या चालक-वाहकांनी ती बस नागपूरऐवजी थेट उमरेड पोलिस ठाण्यात नेली. ते पाहून आरोपी बसच्या चालक-वाहकांना शिवीगाळ करू लागला. तरुणीलाही त्याने धमकी दिली. दरम्यान, पोलिस ठाण्यात तरुणीने झालेला प्रकार कथन केला. तिची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपी दिनेशविरुद्ध विनयभंग तसेच धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
कोठडीतही अरेरावी
विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर उमरेड पोलिसांनी त्याला कोठडीत डांबले. तेथेही त्याची अरेरावी सुरूच होती. पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्याच्यावर 'उपचार करून त्याच्या अंगातील मजनूचे भूत उतरविले.' दरम्यान, आरोपी दिनेशला शुक्रवारी उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची सुटका झाली. ठाणेदार प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुचिता मंडवाले पुढील तपास करीत आहेत.