नागपुरात कुख्यात गुंडांकडून तरुणीची छेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:25 AM2019-08-19T11:25:56+5:302019-08-19T11:28:35+5:30
तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांची पाठराखण करून, गुंडांचा प्रतिकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची अजनी पोलिसांची भूमिका नागरिकांमध्ये रोष निर्माण करणारी ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांची पाठराखण करून, गुंडांचा प्रतिकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची अजनी पोलिसांची भूमिका नागरिकांमध्ये रोष निर्माण करणारी ठरली आहे. हे प्रकरण वरिष्ठांकडे पोहचल्यामुळे आणि वरिष्ठांकडून कानउघाडणी केली जाऊ शकते, हे ध्यानात आल्यामुळे तब्बल सात दिवसानंतर अजनी पोलिसांनी कुख्यात गुंड लकी तेलंग आणि मंगेश टिचकुलेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
११ ऑगस्टच्या रात्री ९.१५ वाजताचे हे प्रकरण आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित तरुणी (वय २२) भाड्याने राहते. ती मोबाईल शॉपीत काम करते. ११ ऑगस्टला ती आपल्या भाड्याच्या घरासमोर घरमालकासोबत गप्पा करीत असताना, तेथे कुख्यात गुंड लकी तेलंग आणि मंगेश टिचकुले आला. त्यांनी तरुणीला अश्लील हातवारे करीत तिची छेड काढली. मंगेश टिचकुलेने तुझे उठाके ले जाना है, गेम बजाना है, असे म्हटले. तरुणीने विरोध केला असता तिला मारहाण केली. घरमालकाने यावेळी आरोपींना हटकले असता त्यावेळी आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळेने आपल्या पाच-सात साथीदारांसह आरोपी तेथे पोहचले. त्यांनी घरमालकाला अश्लील शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला. विरोध करण्यासाठी पुढे आलेले घरमालक, बाजूचे तरुण आणि आरोपींमध्ये हाणामारी झाली. त्यात एक आरोपी जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळाल्यानंतर अजनी पोलीस पोहचले. पोलिसांनी आरोपी लकी, मंगेश आणि घरमालक अशा सर्वांना पोलीस ठाण्यात नेले.
तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांना हटकणे, त्यांचा विरोध करणे गुन्हा आहे का, अशी विचारणा घरमालकाने केली, यावरून अजनी पोलिसांचा इगो हर्ट झाला. त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नका, असे म्हणत कुख्यात लकी आणि साथीदारांच्या तक्रारीवरून गंभीर गुन्हा दाखल करून घरमालकाला पहाटे ४ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले आणि घरमालक, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लकी आणि साथीदारांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी त्यांच्या हाती एनसी (अदखलपात्र) पावती देऊन त्यांना परत पाठविले. विशेष म्हणजे, ज्या तरुणीची छेड काढली तिला पोलीस ठाण्यात पोलिसांदेखतच आरोपी लकी आणि मंगेश टिचकुलेने अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली.
गुंडांसोबतचे साटेलोटे उघड
लकी तेलंग आणि मंगेश टिचकुले हे कुख्यात गुंड आहेत. ते त्यांच्या साथीदारांकडून अवैध धंदेही करवून घेतात. हे पोलिसांच्या रेकॉर्डवर असूनही अजनी पोलिसांनी घटनेच्या दिवशी ते जखमी असल्याचे सांगून, घरमालकाची त्यांच्याविरुद्ध तक्रार घेतली नाही. पोलिसांच्या या संतापजनक भूमिकेमुळे प्रकरण वरिष्ठांकडे पोहचले. वरिष्ठांनी अजनी पोलिसांची कानउघाडणी केल्यानंतर, या प्रकरणात शनिवारी त्या तरुणीची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणातून अजनी पोलिसांचे साटेलोटे उघड झाले आहे. गुंडांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ठाणेदारांना कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र,अनेक ठाण्यातील पोलीस गुंडांना पाठीशी घालतात. लकी तेलंग आणि मंगेश टिचकुलेच्या बाबतीत अजनी पोलिसांनी असाच प्रकार केला आहे. त्यामुळे आता या पोलिसांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.