तरुणाने जपला प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:34+5:302021-01-04T04:08:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनामुळे सर्वांच्याच आयुष्याला कलाटणी मिळाली. कमालीच्या चढ-उताराच्या या प्रवासात अद्यापही माणुसकी जिवंत असल्याचीही उदाहरणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कोरोनामुळे सर्वांच्याच आयुष्याला कलाटणी मिळाली. कमालीच्या चढ-उताराच्या या प्रवासात अद्यापही माणुसकी जिवंत असल्याचीही उदाहरणे बघावयास मिळतात. अशाचप्रकारे माणुसकी तेवत ठेवत एका तरुणाने प्रामाणिकपणा जपला. रस्त्यावर सापडलेली ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची चैन या तरुणाने परत करीत आपल्यातील संस्कारक्षमतेचा परिचय करून दिला.
सौरभ विकास नैताम (वय २२, रा. तळोधी, बाळापूर, ता. नागभीड) असे या प्रामाणिकपणा जपणाऱ्या तरुणाचे नाव आहे. उमरेड पोलिसांनीसुद्धा उत्तम सहकार्य केले.
त्याचे झाले असे की, बोरखेडी फाटक बोथली (बुटीबोरी) येथील गायत्री भानारकर ही महिला आपल्या मुलासमवेत बुटीबाेरी येथील बाजारात जात होती. दरम्यान, या महिलेची पर्स बाजारात हरविली. लगबगीमुळे महिलेच्या लक्षात ही बाब आली नाही. दुसरीकडे सौरभ नैताम आणि जनार्दन कामडी (रा. बुटीबोरी) या दोघांना ही पर्स आढळून आली. यामध्ये एक तोळ्याची सोन्याची चैन होती. सौरभने बुटीबाेरी पाेलीस ठाण्याऐवजी उमरेड ठाणे गाठत साेन्याची चैन कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार आनंद धात्रक यांच्याकडे सोपविली. धात्रक यांनी चांगलीच सतर्कता दाखवीत सहकार्य केले. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी दखल घेत महिलेचे पती तुळशीदास भानारकर यांच्याकडे चैनबाबत शहानिशा केल्यानंतर ती सुपूर्द करण्यात आली.