सावनेर शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच; पुन्हा एका तरुणाने गळफास लावून संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 02:42 PM2022-06-22T14:42:35+5:302022-06-22T14:48:29+5:30
कुटुंबीय शेतात गेल्याने घरी कुणीही नसल्याचे पाहून शुभमने छताला गळफास लावून आत्महत्या केली.
सावनेर (नागपूर) : मागील काही महिन्यांपासून सावनेर शहरात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण व तरुणींची संख्या अधिक आहे. शहरातील शिव मंदिर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने साेमवारी आत्महत्या केल्याने या संख्येत पुन्हा एकने भर पडली आहे. त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.
शुभम जिचकार (३५, रा. खेडकर लेआउट, सावनेर), असे मृत तरुणाचे नाव आहे. कुटुंबीय शेतात गेल्याने घरी कुणीही नसल्याचे पाहून शुभमने छताला गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने कुटुंबीय शेतातून घरी परत आल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी शुभमला खाली उतरवून सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
काही दिवसांपूर्वी शहरातील हाेळी चाैकात, तसेच पहलेपार परिसरात राहणाऱ्या तरुणांनी आत्महत्या केली. तरुण व तरुणींच्या वाढत्या आत्महत्यांमुळे इतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुले- मुली घरी माेकळेपणाने बाेलत नसल्याने त्यांच्या डाेक्यात नेमके काय विचार सुरू आहेत, हे कळत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्यांवर उपाय शाेधणे व त्यांना धीर देणे शक्य हाेत नसल्याचे काही पालकांनी सांगितले. तरुणांनी वैफल्यग्रस्त व आत्मकेंद्रित न हाेता मनमाेकळेपणाने जगावे, त्यांच्या समस्या वडीलधाऱ्या माणसांना सांगाव्यात. प्रत्येक समस्या साेडविता येते, असा सल्लाही ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिला.