फेसबुक लाईव्ह केले अन् नदीत उडी घेत जीव दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:39 AM2023-09-12T10:39:52+5:302023-09-12T10:45:08+5:30

तरुणीने दिली होती अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

young man creates live stream on facebook and jumped into the river | फेसबुक लाईव्ह केले अन् नदीत उडी घेत जीव दिला

फेसबुक लाईव्ह केले अन् नदीत उडी घेत जीव दिला

googlenewsNext

नागपूर : एका मुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह केल्यावर आत्महत्या केली. संबंधित तरुणाने व्हिडीओ काढल्यानंतर कन्हान नदीच्या पुलावरून नदीत उडी घेत जीव दिला. कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली.

मनीष रामपाल यादव (३५, मिनीमातानगर) असे मृतकाचे नाव आहे. तो इलेक्ट्रिकचे दुकान चालवायचा. तो रविवारी सकाळी १० वाजता घरून दुचाकीने निघाला. सायंकाळी त्याने अगोदर मोबाईलवर व्हिडीओ तयार केले व त्यात त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने फेसबुक लाईव्ह केले व मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. त्यानंतर त्याने कन्हान नदीत उडी घेत जीव दिला.

दरम्यान, तो सायंकाळ पर्यंत घरी न पोहोचल्याने घरच्या मंडळींनी त्याच्या मोबाईल क्रमांकावर फोन केले. मात्र त्याने ते उचलले नाही. त्याच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे दुचाकी दिसली. दुचाकीची डिक्की उघडली असता त्यात मोबाईल दिसून आला. त्यातील व्हिडीओतून नेमका प्रकार समोर आला. त्याच्या संपर्कात असलेल्या एका मुलीने त्याला जाळ्यात ओढले व पैशांची मागणी केली. जर पाच लाख रुपये दिले नाही तर अत्याचाराची तक्रार करू अशी धमकी मुलीसह तिच्या आईवडिलांनी दिली.

दहा किलोमीटर अंतरावर आढळला मृतदेह

मनिषने त्याच्या परीने पैसे जमविण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे जमा न होऊ शकल्याने त्याने मानसिक तणावातून अखेर आत्महत्या केली. सोमवारला सकाळी कन्हान नदीत शव शोधण्यात आले. मनीषचे शव नेरी गावाच्या पुढे १० किलोमीटर अंतरावर आढळून आले. पोलिसांनी व्हिडीओत ज्यांची नावे नमूद होती, त्यांना बोलावून चौकशी केली.

Web Title: young man creates live stream on facebook and jumped into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.