मुलगी बघायला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; आई व वडील गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 02:11 PM2022-11-26T14:11:45+5:302022-11-26T14:20:39+5:30
शिवनी (भाेंडकी) शिवारात कार उलटली
रामटेक (नागपूर) : मुलगी बघून परत येत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशझाेतात चालकाचे डाेळे दिपले आणि अनियंत्रित कार राेडलगतच्या शेतात शिरून उलटली. यात तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचे आईवडील गंभीर जखमी झाले. ही घटना रामटेक पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-तुमसर मार्गावरील शिवनी (भाेंडकी) शिवारात गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.
अतुल जीवनलाल कावरे (२८) असे मृताचे, तर जसवंता कावरे व जीवनलाल कावरे अशी जखमी आईवडिलांची नावे आहेत. तिघेही गोबरवाही, ता. तुमसर, जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे. अतुलला लग्न करावयाचे असल्याने ताे आईवडिलांसाेबत नागपूर शहरात गुरुवारी मुलगी बघण्यासाठी गेला हाेता. कार्यक्रम आटाेपल्यानंतर तिघेही त्यांच्या कारने (एमएच-०५/एजे-६६८७) रामटेक मार्गे परतीच्या प्रवासाला निघाले. अतुल कार चालवित हाेता.
शिवनी (भाेंडकी) शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशझाेतात अतुलचे डाेळे दिपले आणि त्याचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला. त्यामुळे ती कार राेडलगतच्या धानाच्या बांध्यात शिरली व उलटली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. अतुलच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती. अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पाेलिसांना सूचना देत तिघांनाही रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.
तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती अतुलला मृत घाेषित केले, तर जीवनलाल व जसवंता यांच्यावर प्रथमाेपचार करून त्यांना कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.