नागपुरात कबुतरबाजीतून तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:15+5:302021-03-28T04:07:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कबुतरबाजीतून निर्माण झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्यावर चाकूचे घाव घालून त्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कबुतरबाजीतून निर्माण झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या केली. अक्षय सिद्धार्थ बागडे (वय २५) असे मृताचे नाव असून राजा ऊर्फ अरमान ऊर्फ अजहर जाफर शेख (वय २७) असे आरोपीचे नाव आहे.
मृतक बागडे आणि आरोपी शेख हे गिट्टीखदानमधील गवळीपुऱ्यात शेजारीच राहत होते. ते दोघेही कबुतर पाळत. शुक्रवारी रात्री ९च्या सुमारास या दोघांमध्ये कबुतर उडविण्याच्या कारणावरून वाद झाला. शिवीगाळ आणि हाणामारीनंतर आरोपी राजा ऊर्फ अरमान शेखने अक्षय बागडेवर शस्त्राचे घाव घातले. त्याच्या छातीवर वार बसल्यामुळे तो गतप्राण झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच गिट्टीखदान पोलीस तिकडे धावले. त्यांनी तेथील परिस्थिती निवळल्यानंतर मृत बागडेची बहीण रोशनी रॉबिन साळवे (वय ३१) हिच्या तक्रारीवरून आरोपी राजा ऊर्फ अरमान शेख विरुद्धहत्येचा गुन्हा दाखल केला.
--
आरोपीला सक्करदऱ्यात पकडले
हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला. एपीआय दत्ता पेंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर शोधाशोध केल्यानंतर आरोपी ताजबाग, सक्करदरामध्ये दडून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक तिकडे पोहोचले. त्यांनी आज दुपारी १२च्या सुमारास आरोपी शेखच्या मुसक्या बांधल्या.
----