अनाेळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे अंगलट, ई-बाईक खरेदीच्या नावावर तरुणास गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 01:50 PM2022-03-26T13:50:01+5:302022-03-26T13:55:27+5:30
या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली.
कन्हान (नागपूर) : तरुणाला ई-बाईक खरेदी करावयाची असल्याने त्याने ती ऑनलाइन बुक केली. त्यातच त्याने दाेन अनाेळखी व्यक्तींवर विश्वास ठेवत त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या बँक खात्यात १ लाख ३० हजार रुपये जमा केले. त्या दाेघांनी तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार कन्हान शहरात नुकताच घडला.
मयूर विपीनकुमार मल्लिक (३०, रा. कांद्री-कन्हान,ता. पारशिवनी) याला ई-बाईक खरेदी करावयाची हाेती. त्यामुळे त्याने ओला इलेक्ट्राॅनिक माेबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीकडे ती ऑनलाइन बुक केली. त्यातच त्याच्याशी ८ ते १० मार्च या काळात दाेन अनाेळखी व्यक्तींनी फाेनवर संपर्क केला. दाेघांनीही मयूरला विश्वासात घेत त्याला त्याचे आधारकार्ड,पॅनकार्ड व फाेटाे माेबाइलवर पाेस्ट करण्याची व ४९९ रुपये भरण्याची सूचना केली.
मयूरने त्या दाेघांवर विश्वास ठेवत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर दाेघांनीही त्याला तीन वेगवेगळ्या बँक खात्यात १ लाख ३० हजार रुपये जमा करण्याची सूचना केली. मयूरने ही संपूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस आणि गुगल पेद्वारे जमा केली. एवढेच नव्हे तर, त्या दाेघांनी मयूरला ई-बाईकच्या वाहतुकीचा खर्चही मागितला. त्यानंतर २० दिवस लाेटूनही त्याला ई-बाईक पाठविण्यात आली नाही.
शिवाय, त्या दाेन्ही अनाेळखी व्यक्तींनी त्यांचे फाेन बंद केले. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ४२०,३४, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.