नागपुरात जुन्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:17 PM2018-08-31T22:17:39+5:302018-08-31T22:18:16+5:30

अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

Young man murdered by old controversy in Nagpur | नागपुरात जुन्या वादातून तरुणाची हत्या

नागपुरात जुन्या वादातून तरुणाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देअट्टल गुंडांनी केला गेम : अजनीत दिवसाढवळ्या थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील अट्टल गुंडांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या जुन्या वादातून एका तरुणाची हत्या केली. अजनीतील सम्राट अशोक गार्डनमध्ये ही थरारक घटना घडली. आरोपींनी मृताच्या दोन मित्रांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.
पवन ऊर्फ आलू भोसले (वय २४, रा. वसंतनगर), स्रेहांशू बोरकर (वय २२, रा. भगवाननगर) आणि निहाल शंभरकर (वय २३, रा. कुकडे लेआऊट) अशी आरोपींची नावे आहेत. प्रतीक संजय ढेंगरे (वय १९, रा. चंद्रमणीनगर) असे मृताचे नाव आहे.
मार्च महिन्यात प्रतीकचा मित्र सूरज बिहारी याच्या वाढदिवशी आरोपी आलूसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होऊ लागल्या. आलू हा कुख्यात गुंड असून, त्याची अजनीत मोठी दहशत आहे. प्रतीक त्याला घाबरत नव्हता. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी कुख्यात आलू प्रयत्न करीत होता. तीन दिवसांपूर्वी प्रतीक आणि आलूचे भांडण झाले. यावेळी आलूने प्रतीकला तेरा गेम करूंगा अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास प्रतीक, त्याचा मित्र रुत्विक नत्थू बोरकर (वय २१) आणि अन्य एक असे तिघे गार्डनमध्ये गप्पा करीत होते. आलूला त्याची कुणकुण लागताच तो, शंभरकर आणि बोरकर असे तिघे तेथे आले. आलूने प्रतीकला थापड मारली. प्रतीकने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्या छातीवर चाकूचे घाव घातले. तो पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी त्याच्या पायावर लाकडी फटके मारले. हृदयाजवळ घाव बसल्याने प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहून मदतीसाठी धावलेल्या रुत्विक आणि अन्य एकावरही आरोपींनी लाकडी फळीचे फटके मारून त्यांना पळवून लावले. हे थरारक हत्याकांड घडले तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी होती. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही.

मृतदेह उचलून नेला
प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. आरोपींनी त्याला आपल्या दुचाकीवर मध्ये बसवले आणि मेडिकलच्या परिसरात नेऊन फेकल्यानंतर ते पळून गेले. दरम्यान, दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. मोठ्या संख्येत नागरिकांनी गार्डनमध्ये धाव घेतली.
त्यानंतर जमाव मेडिकलकडे पोहचला. दरम्यान, माहिती कळताच अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये आपल्या ताफ्यासह पोहचले. पाठोपाठ पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनीही धाव घेतली. उपायुक्त भरणे यांनी आरोपींच्या शोधासाठी लगेच विविध भागात पोलीस पथके रवाना केली. रात्रीपर्यंत आरोपींची शोधाशोध सुरू होती. दरम्यान, तरुण मुलाच्या हत्येमुळे प्रतीकच्या कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात झाला आहे. चंद्रमणीनगरातही यामुळे तणाव तसेच शोककळा पसरली आहे.

दहशत पसरविण्यासाठी गुन्हा
कुख्यात आलू २०१२ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार, खंडणी वसुली, शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शंभरकरविरुद्ध चार तर बोरकरविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे करणारे आणि त्यांच्या आश्रयाने सक्रिय असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम उघडकी. त्यामुळे या भागातील अनेक कुख्यात गुन्हेगार पळून गेले. काही कारागृहात आहेत. परिणामी या भागात आपली दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यातून खंडणी वसुली करता यावी यासाठी कुख्यात आलू आणि त्याच्या साथीदारांनी प्रतीकचा गेम केल्याची चर्चा आहे.

 

Web Title: Young man murdered by old controversy in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.