आईला मारहाण करून स्वत:च पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणाचा दारातच कोसळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 09:00 PM2021-12-07T21:00:36+5:302021-12-07T21:01:09+5:30
Nagpur News आईला मारहाण करून स्वत:च पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या एका तरुणाचा ठाण्याच्या दारात कोसळून मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नागपूर : आईला मारहाण करून स्वत:च पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या एका तरुणाचा ठाण्याच्या दारात कोसळून मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण ‘कस्टडी डेथ’चे असल्यामुळे पोलिसांनी सीआयडीला चाैकशीसाठी पत्र लिहिले आहे.
रवी मोहनलाल पारधी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. तो कपिलनगरातील जोशी गार्डनजवळ राहत होता. प्लंबर असलेल्या रवीला दारू, गांजाचे भारी व्यसन होते. त्यामुळे तो अनेकदा कामावरच जात नव्हता. ज्यावेळी कामावर जात असे त्यावेळी पैसे मिळताच तो दारू, गांजात उधळायचा. दारू पिल्यानंतर त्याला कसलेही भान राहत नव्हते. तो कुटुंबातील सदस्यांसह वृद्ध आई-वडिलांनाही मारहाण करीत होता.
सोमवारी रात्री दारूच्या नशेत त्याने आपल्या वृद्ध आईला पाईपने मारहाण केली. त्यानंतर स्वत:च तक्रार देण्यासाठी कपिलनगर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या मागोमाग त्याचे वडील आणि परिवारातील इतर सदस्यही पोहोचले. रवीने त्याच्या आईला बेदम मारहाण केल्याचे त्याचे वडील सांगू लागले. यावेळी नशेत असलेला रवी पोलीस ठाण्यात आरडाओरड करू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला आवरले. प्रारंभी बाहेरच्या बाकड्यावर आणि नंतर डीबी रूममध्ये बसवले. रात्री १०.३० च्या सुमारास वडिलांची तक्रार नोंदविणे सुरू असताना मोठमोठ्याने ओरडत रवी पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊ लागला आणि दारातच कोसळला. त्याला दरदरून घाम फुटला होता. पोलीस कारवाई करतील या धाकामुळे रवी असा करीत असावा, असे सर्वजण बोलू लागले. तो घरीही असाच करतो, असेही त्याचे आईवडील म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी त्याला बाजूला बसवण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच घरच्यांना सोबत घेऊन पोलिसांनी रवीला उपचारासाठी मेयोत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी कपिलनगर ठाण्यात जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस तसेच कुटुंबीयांचे जाब-जबाबही घेतले. रवीचे पोलीस ठाण्यात येणे, आरडाओरड करण्यापासून दारात कोसळण्यापर्यंतचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत दिसत असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
रवीच्या खिशात आढळला गांजा
ठाण्याच्या आवारात प्लंबरचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच पोलीस दलाला चांगलाच हादरा बसला. यावर्षी पारडी आणि नंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘कस्टडी डेथ’ची घटना घडल्याने आधीच पोलीस हादरले आहेत. त्यात आता कपिलनगरातही ही घटना घडल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी रवीच्या कपड्यांची झडती घेतली असता त्यात गांजाची पुडी आढळल्याचे पोलीस सांगतात.
रवीचा मृत्यू नेमका कसा झाला ?
दरम्यान, रवीच्या कुटुंबीयांसमोरच ही घटना घडल्याने पोलिसांवरील बालंट तूर्त टळले आहे. रवीचे वडील मोहनलाल तुफानी पारधी (वय ६९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सीआयडीच्या अधीक्षक सुटीवर असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वृत्त लिहिस्तोवर कुणीही पोहोचले नसल्याचे सांगितले जात होते. दुसरे म्हणजे, रवीचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याचाही अहवाल रात्री ७ वाजेपर्यंत डॉक्टरांकडून स्पष्ट झाला नव्हता.
सीआयडीला पत्र दिले - पोलीस आयुक्त
पोलिसांनी आरोपी म्हणून रवीला ताब्यात घेतले नव्हते किंवा पकडून पोलीस ठाण्यातही आणले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाला कस्टडी डेथ म्हणता येणार नाही, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले. मात्र, ‘टेक्निकली कस्टडी डेथ’च्या प्रकारात हे प्रकरण येत असल्याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी पत्र लिहून घटनाक्रमाची आम्ही माहिती दिली. तपास करण्याचीही सूचना केल्याचे अमितेशकुमार म्हणाले.
---