नोकरीच्या शोधातील तरुण अडकला टेलिग्राम टास्कच्या जाळ्यात, २.८० लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: November 22, 2023 05:11 PM2023-11-22T17:11:03+5:302023-11-22T17:11:42+5:30
ॲपवर रिझ्युम अपलोड करणे पडले महागात
नागपूर : नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका तरुणाला एका ॲपवर आपला रिझ्युम अपलोड करणे फारच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी त्याला टेलिग्राम टास्कच्या जाळ्यात ओढत २.८० लाखांचा गंडा घातला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सूरजराज रमेशराव शेंडे (३४, राणी दुर्गावती नगर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ऑनलाईन माध्यमांतून नोकरी शोधत होता. त्याने अपना नाम या ॲपवर स्वत:चा रिझ्युम अपलोड केला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्याला एका व्यक्तीचा फोन आला व साईडएअर वर्ल्ड या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ‘साईड नेटवर्क’ या कंपनीत विमानाची तिकीटे बुक करण्याचे ऑनलाईन काम असल्याची बतावणी केली. या कामात पैसे लावल्यास जास्त नफा मिळेल असे आमीष दाखविले व सुरुवातीच्या कामावर टेलिग्राम ॲपच्या खात्यावर रक्कम पाठवली. त्यामुळे सूरजराजचा विश्वास बसला.
आरोपींनी त्यानंतर गुंतवणूकीवर नफ्याचे आमीष दाखवत वेगवेगळ्या खात्यांवर २.८० लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र कुठलाही नफा दिला नाही. सूरजराजने समोरील व्यक्तीला रक्कम परत मागितली असता आणखी पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूरजराजने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.