तब्बल १०७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या युवकाने केली आजारावर मात; डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 08:03 PM2021-11-19T20:03:22+5:302021-11-19T20:11:57+5:30
Nagpur News एक दोन नव्हे तर तब्बल १०७ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या युवकाने आजारावर मात केली. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना त्याने योग्य तो प्रतिसाद देत पुन्हा जीवनाची दोरी पकडल्याची घटना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडली.
नागपूर : विविध चाचण्यांच्या अहवालावरून अखेर १५ वर्षीय युवकाला ‘टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स’ या दुर्मीळ आजाराचे निदान झाले. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. रुग्णानेही उपचाराला प्रतिसाद दिला. यामुळे तब्बल १०७ दिवसांनी रुग्ण व्हेंटिलेटरमधून बाहेर आला. ही घटना खासगी रुग्णालयातील नव्हे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आहे. मृत्यूच्या दाढेतून मुलाला बाहेर काढल्याने मुलाच्या आईने सर्व डॉक्टरांचे आभार मानले.
गडचिरोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सुनीलला (बदलेले नाव) मिरगीचा आजार. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाल्याने लहान भावाची व त्या मुलाचीही जबाबदारी त्याच्या आईच्या खांद्यावर आली. खासगी काम करून ती घर चालवायची. अशातच २४ जुलै २०२१ रोजी अचानक सुनीलची प्रकृती खालावली. त्याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचा ताप वाढण्यासोबतच संपूर्ण अंगावर व आंतर अवयवातही फोडे आले. यामुळे डॉक्टरांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले.
सुरुवातील दोन दिवस त्वचारोग विभागात ठेवले. परंतु प्रकृती अस्वस्थ झाल्याने २९ जुलै २०२१ रोजी मेडिकलच्या वार्ड २४ च्या अतिदक्षता विभागात भरती केले. या विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात उपचाराला सुरुवात झाली. तपासणीतून त्याला ‘टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स’ या दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. त्याला श्वासही घेता येत नव्हता. यामुळे त्वरित व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याने अॅण्टिबायोटिक औषधांनाही तो प्रतिसाद देत नव्हता. परिणामी डॉक्टरांनी मल्टिपल अॅण्टिबायोटिक देणे सुरू केले. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. तब्बल १०७ दिवसानंतर म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले. नुकताच त्याला सामान्य वॉर्डात हलविण्यात आले. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी मिळणार आहे.
या डॉक्टरांची उपचारात मदत
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात व डॉ. मिलिंद व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात डॉ. अर्चना अहेर, डॉ. अभिषेक पांडे, डॉ. रिया साबू, डॉ. श्रीजा खंडेलवाल, डॉ. सुरज हिवरकर, डॉ. सौरभ मेश्राम, डॉ. तुषार खडसे, डॉ. पूजा बोरलेपवार, डॉ. प्रज्ञा गावीत, डॉ. सौरभ शर्मा, डॉ. शीतल भरसाड यांच्यासह सिस्टर इंचार्ज गीता कन्नाके आदींनी मदत केली.
आजाराची गुंतागुंत वाढली होती
सुनीलाचा आजार इतका पसरला होता की त्याला श्वास घेणेही कठीण झाले होते. फुफ्फुसावर सूज येऊन त्यामध्ये रक्तातील पाणी जमा होऊ लागले होते. त्याचा रक्तदाब कमी होण्यासोबतच किडनीवर त्याचा प्रभाव पडला होता. मेंदूच्या नसांमध्येही रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. आजाराची गुंतागुत वाढली होती. व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नामुळे त्याची प्रकृती स्थिर झाली. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येईल.
-डॉ. मिलिंद व्यवहारे, प्रमुख आयसीयू, मेडिसिन विभाग, मेडिकल