शत्रूपेक्षा निसर्गाशी लढतो जवान
By admin | Published: February 11, 2016 03:12 AM2016-02-11T03:12:41+5:302016-02-11T03:12:41+5:30
सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात बर्फाखाली गाडल्या गेलेल्या दहा जवानांपैकी लान्सनायक हनुमंतअप्पा कोप्पड यांनी मृत्यूशी कडवी झूंज दिली.
मंगेश व्यवहारे नागपूर
सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात बर्फाखाली गाडल्या गेलेल्या दहा जवानांपैकी लान्सनायक हनुमंतअप्पा कोप्पड यांनी मृत्यूशी कडवी झूंज दिली. लष्कराला त्यांना बर्फाच्या ढिगाऱ्यातून बाहेर जिवंत काढण्यात यश आले. प्रचंड इच्छाशक्ती आणि नशिबाच्या बळावर हनुमंतप्पा कोप्पड हा जवान हिमस्खलनातून बचावला, अशी भावना मेजर मिलिंद भृशुंडी यांनी व्यक्त केली. सियाचीनमध्ये हिमस्खलन हा नेहमीचाच भाग आहे. येथे जवानांना शत्रूपेक्षा निसर्गाशीच जास्त लढावे लागते, सियाचीनमधील थरार नागपुरातील मेजर मिलिंद भृशुंडी यांनी तीन वर्षे अनुभवला आहे.
भारतीय सेनेसाठी सियाचीन ही सर्वात भयावह बॉर्डर. एकीकडे चायना आणि दुसरीकडे पाकिस्तान निव्वळ बर्फाने आच्छादलेला हा भाग. उन्हाळ्यात तापमान उणे १० डिग्री सर्वोच्च, इतर ऋतूत उणे ४५ ते ५० डिग्री सेल्सियस तापमानात येथे जवान देशाच्या सुरक्षेत तैनात असतो. ७२ किलोमीटरचा हा परिसर हजारो फूट उंच बर्फाच्या टेकड्या, जसेजसे उंच जावे तसतसे कमी कमी होत जाणारे आॅक्सिजन, पायी चालण्याशिवाय दुसरा पर्याय येथे नाही.
जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती
नागपूर : ‘क्रेव्हास’ ची भीती, नियमित होणारे हिमस्खलन आणि नियमित होणारे शत्रूचे हल्ले याचा सामना सियाचीनच्या पोस्टवरील जवान नियमित करीत असतो. या वातावरणात एकरूप होण्यासाठी जवानांना बूट, गरम कपडे दिले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्नो ब्लार्इंडनेस हा आजार होऊ नये म्हणून विशेष कॉर्टीना गॉगल्स दिला जातो. या परिधानाचाही इथे फारसा परिणाम होत नाही. प्रचंड गारठ्यामुळे, आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे येथे भूक लागत नाही. बर्फाच्या प्रदेशात होणारे जीवघेणे आजार येथे जवानांना होतात. स्वयंपाक तर अशक्यच चॉकलेट आणि ड्रायफ्रुटवर त्यांना कॅलरीज टिकवून ठेवावी लागते. केरोसिनशिवाय तहान भागत नाही. येथे तैनात असलेल्या जवानांमध्ये जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते. डॉक्टरांना मात्र ते देव मानतात. शत्रूंच्या हल्ल्यात सर्वात पहिले डॉक्टरांना सुरक्षित करतात. ७२ किलोमीटरच्या या सियाचीनच्या परिसरात शेकडो पोस्ट आहे. वाहनांची सोय नसल्याने जवांनाना आवश्यक त्या वस्तू हेलिकॉप्टरने सोडल्या जातात. एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जाण्यासाठी कधी दोन दिवस तर कधी तीन महिनेसुद्धा लागतात. दोराच्या माध्यमातून पोस्टपर्यंत पोहचण्यासाठी लिंक तयार केली आहे. या आधारे जवान पायी जातात. अशात हिमवादळ येथे बर्फाच्या भिंती तयार होतात. यात अर्धा फुटावरचेही दिसत नाही. अशातून मार्ग काढत आपापल्या पोस्टवर पोहचतो. मेजर मिलिंद भृशुंडी हे आर्मी मेडिकल कोरमध्ये होते. ते डॉक्टर असल्याने तीन वर्ष त्यांनी जवानांच्या आरोग्याची काळजी घेतली. (प्रतिनिधी)
सियाचीन भरपूर शिकवून गेले
सियाचीनचा अनुभव हा थरारक असला तरी, हा अनुभव जीवन जगण्याची कला शिकवून गेला. उद्या आपण राहू की नाही, अशा भीतीदायक वातावरणात, जगण्यासाठीची तळमळ जाणवली. मातृभूमीबद्दलचे प्रचंड प्रेम, त्यातून जवानांना मिळणारी ऊर्जा येथे अनुभवायला मिळते. खरोखरच आपले जवान आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. सियाचीनच्या जवानांना कोटी कोटी सलाम.
मेजर डॉ. मिलिंद भृशुंडी, आर्मी मेडिकल कोर