तरुणांनी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा
By admin | Published: July 26, 2016 02:42 AM2016-07-26T02:42:45+5:302016-07-26T02:42:45+5:30
युवा मतदारांना मतदार नोंदणीत सक्रिय सहभागी करून तरुण मतदारांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे : नवीन मतदारांना मतदार कार्डाचे वितरण
नागपूर :युवा मतदारांना मतदार नोंदणीत सक्रिय सहभागी करून तरुण मतदारांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते सोमवारी मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर राऊत, प्रकाश शर्मा, निहाल शेख, लीना फलके, गिरीश जोशी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुर्वे यांनी नागपूर शहरातील महाविद्यालयातील कॅम्पस अॅम्बेसेडर, नोडल अधिकारी व स्टुडंट अॅम्बेसेडर यांना मतदार जागृतीकरिता विविध उपाययोजना करण्याकरिता मार्गदर्शनसुद्धा केले. नवीन मतदार ओळखपत्र वाटप कार्यक्रमात दक्षिण-पश्चिम, दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील नवीन मतदारांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोहर राऊत व प्रकाश शर्मा यांनी विद्यार्थी व प्राचार्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी विद्यार्थी कल्याणचे संचालक निहाल शेख यांनी विद्यापीठातील सर्व महाविद्यालये मतदार जागृतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचा विश्वास व्यक्त केला. संचालन तहसीलदार लीना फलके यांनी केले. उपजिल्हाधिकारी मनोहर राऊत यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)