नागपूर विद्यापीठात ‘यंग टीचर्स’ आघाडीवर ; शिक्षण मंचाची हवा गूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:18 PM2017-11-27T23:18:29+5:302017-11-27T23:28:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला. विधिसभा तसेच विद्वत् परिषदेत ‘यंग टीचर्स’चे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले. तर त्याखालोखाल अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वातील ‘सेक्युलर पॅनल’नेदेखील चांगली कामगिरी केली. संपूर्ण ताकदीने निवडणुकांत उतरलेल्या शिक्षण मंचाला मात्र अपयशाचा सामना करावा लागला.
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी रेकॉर्डब्रेक ९२.८२ टक्के मतदान झाले. सात वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांचे ठोकेही वाढले होते. विधिसभेच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी सोमवारी मतमोजणी सुरू झाली. सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत मतपत्रिकांची छाननीच चालली व त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला शिक्षक गट वगळता विधिसभेची मतगणना सुरू झाली. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच यंग टीचर्स असोसिएशनने आघाडी घेतल्याचे चित्र होते.
विधिसभेत प्राचार्य गटात यंग टीचर्स असोसिएशनचे ५ उमेदवार निवडून आले. तर विद्यापीठ शिक्षक गट आणि व्यवस्थापन प्रतिनिधी गटात प्रत्येकी २ उमेदवार निवडून आले. तर ‘सेक्युलर पॅनल’ने ७ जागांवर यश मिळविले. शिक्षण मंचाच्या पदरात २ जागा पडल्या. शिक्षक गटातील मतगणना रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे तेथील जागांची आकडेवारी समोर येऊ शकली नाही.
तायवाडे, दीक्षित पहिल्याच फेरीत विजयी
विधिसभेतील प्राचार्य व व्यवस्थापन प्रतिनिधी गटात बलाढ्य उमेदवार होते. प्राचार्य गटात नरेंद्रसिंह दीक्षित यांनी पहिल्याच फेरीत विजयी मतांचा ‘कोटा’ पूर्ण केला. तर विवेक नानोटी यांनी तिसऱ्या व संजय धनवटे यांना पाचव्या फेरीत विजय मिळाला. व्यवस्थापन प्रतिनिधी गटात डॉ. बबन तायवाडे यांनी पहिल्याच फेरीत ५० मते घेत ‘कोटा’ पूर्ण केला. दुष्यंत चतुर्वेदी यांना दुसºया फेरीत तर आर. जी. भोयर यांना चौथ्या व अखेरच्या फेरीत विजय मिळाला.
‘फार्मसी’वरून आक्षेप
विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील ‘फार्मास्युटिकल सायन्स’ अभ्यास मंडळाच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ झाला. नितीन उंदीरवाडे व धर्मेंद्र मुंधडा यांना सारखी मते पडल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. कुलसचिवांनी ही चिठ्ठी काढली. मात्र याला ‘सेक्युलर पॅनल’चे डॉ.डी.के.अग्रवाल यांनी आक्षेप घेतला. नियमानुसार ही ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली नसल्याचा त्यांनी दावा केला. अखेर कुलगुरूंकडे हा आक्षेप नोंदविण्यात आला.
‘इनकमिंग’ ठरले फ्लॉप
सेक्युलर पॅनलला खिंडार पाडत शिक्षण मंचाने तेथील काही प्राध्यापकांना आपल्या गटात सामील करून घेण्यात यश मिळविले होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. विद्यापीठ शिक्षक गटातून विधिसभेत राजेंद्र काकडे दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र सेक्युलर पॅनलचे उमेदवार ओमप्रकाश चिमणकर यांनी त्यांचा पराभव केला. काकडे हे या गटात अखेरच्या स्थानी राहिले.
विजयी झालेले चर्चित चेहरे
डॉ. बबन तायवाडे, डॉ. शरयू तायवाडे, स्मिता वंजारी, मृत्यूंजय सिंह, दुष्यंत चतुर्वेदी, आर. जी. भोयर, डॉ. विवेक नानोटी
यांचा झाला पराभव
डॉ.राजेंद्र काकडे, पुरुषोत्तम थोटे, डॉ.स्नेहा देशपांडे
निकाल मान्य : कल्पना पांडे
यंदाच्या निवडणूकांमध्ये गमविण्यासारखे आमच्याकडे काहीच नव्हते. आम्ही आपल्या परिने पुर्ण तयारी केली होती. मात्र मत मिळू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला निकाल मान्य आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे यांनी केले.
विजयाची खात्री होतीच : डॉ.बबन तायवाडे
विद्यापीठात आम्ही जी कामे केली आहेत त्याची पावतीच आज मतदारांनी दिली आहे. शिक्षकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. त्यामुळे विजयाची खात्री होतीच, असे मत यंग टीचर्स असोसिशनचे अध्यक्ष डॉ.बबन तायवाडे यांनी व्यक्त केले.