नागपुरात रक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 11:22 PM2021-05-17T23:22:32+5:302021-05-17T23:24:52+5:30
Young woman attacked for robbing महावितरणच्या वीजबिलाची रक्कम लुटण्यासाठी एका आरोपीने तरुणीवर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी जबर जखमी झाली. सोमवारी दुपारी १.३० ते २ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या वीजबिलाची रक्कम लुटण्यासाठी एका आरोपीने तरुणीवर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी जबर जखमी झाली. सोमवारी दुपारी १.३० ते २ च्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणी २२ वर्षांची असून, ती मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एनएडीटी लगतच्या वीजबिल भरणा केंद्रावर कलेक्शनचे काम करते. सोमवारी दुपारी १.३०च्या सुमारास जमा केलेली रक्कम ड्रॉवरमध्ये ठेवून तिने कुलूप लावले आणि जेवण केले. त्यानंतर, ती कार्यालयाच्या बाहेर असलेल्या वॉशरूममध्ये गेली. तेथे दडून असलेल्या एका आरोपीने कॅश काउंटरची चावी हिसकावण्यासाठी तरुणीवर हल्ला केला. तिने विरोध केला असता, आरोपीने तिच्या डोक्यावर दगडाने मारले. ती बचावासाठी ओरडू लागली. त्यामुळे वीज भरायला आलेल्या एका महिलेचे तिच्याकडे लक्ष गेले. त्या महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे कार्यालयातील अन्य कर्मचारी तिकडे धावले. ते पाहून आरोपी कुंपण भिंतीवरून उडी मारून पळून गेला.
जखमी तरुणीच्या डोक्यातून रक्ताची धार वाहात असल्याने कर्मचारी घाबरले. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यावरून सदर, तसेच मानकापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तरुणीला मानकापूर चौकातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. सायंकाळी या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त विनिता साहू, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यानंतर, इस्पितळात जाऊन तरुणीची विचारपूस केली. रात्री या प्रकरणात मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.