मानलेल्या बहिणीवरच जडला जीव, केला विनयभंग; आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 11:39 AM2021-12-16T11:39:56+5:302021-12-16T11:45:27+5:30
गिट्टीखदानमध्ये तरुणीशी मानलेल्या भावानेच छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
नागपूर : तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून मानलेल्या भावानेच तिचा पाठलाग करून छेड काढणे सुरू केले. तिचा विनयभंग केल्याची घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पीडित २१ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. तिचे आई-वडील नागपुरात मजुरी करतात. आरोपी तरुणही तिच्याच गावचा असून तोदेखील कामाच्या शोधात नागपुरात आला. दोघांची ओळख झाली आणि आडनावही सारखेच असल्याने तिने त्याला घरी बोलावले व आई-वडीलांशी परिचय करून दिला. यानंतर, त्याचे तरुणीच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. भाऊ-बहिणीचे नाते असल्यामुळे त्याच्याकडे कोणीही संशयाच्या नजरेने बघितले नाही. हळू-हळू त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले, तिलाही तो आवडायला लागला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. परंतु, आडनाव एकच असल्यामुळे लोक काय म्हणतील, असा सवाल करत तरुणीने लग्नास नकार दिला.
मात्र, तो ऐकून घेण्यास तयार नव्हता. तो तिला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांनी नागपुरातील युवकाशी तिचे लग्न ठरविले. त्यामुळे, हा आणखीन चिडला व त्याने तिला लग्न न करण्यासाठी दमदाटी करीत धमकीही दिली. मात्र, तरुणीने त्याच्या धमकीला न जुमानता नकार देत साक्षगंध उरकून घेतले. त्यामुळे त्याने तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मिळवत त्याला तरुणीचे फोटो पाठवत त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली व लग्न न करण्याचा सल्ला दिला.
होणाऱ्या पतीने तरुणीला याबाबत विचारणा केली असता तिने थेट नकार दिला. व पुढे असा प्रकार घडू नये, यासाठी तिने होणाऱ्या पतीसह गिट्टीखदान पोलिसात मानलेल्या भावाविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.