दगाबाज वराची शिकार झाली नोएडाची युवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:20+5:302020-12-04T04:21:20+5:30
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून रोख आणि किमती सामान पळविणाऱ्या दगाबाज वराने आणखी एका महिलेला शिकार बनविले आहे. २० ...
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून रोख आणि किमती सामान पळविणाऱ्या दगाबाज वराने आणखी एका महिलेला शिकार बनविले आहे. २० दिवसातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर पोलीस दगाबाज वराचा शोध घेत आहेत.
नोएडा (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी ३८ वर्षाची शोभना मल्टीनॅशनल कंपनीत अधिकारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभना अविवाहित आहे. तिची काही दिवसापूर्वी शादी डॉट कॉमच्या माध्यमातून कथित ३८ वर्षाच्या रोमी अरोरासोबत ओळख झाली. रोमीने आपण अविवाहित असल्याचे तिला सांगितले. त्याने आपण दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथील रहिवासी असल्याचे सांगून नुकतेच आपणास नागपूरच्या मिहान प्रकल्पात मोठे कंत्राट मिळाल्याची माहिती दिली. त्याने शोभनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दोन महिन्यात आपण लग्न करणार असल्याचे त्याने शोभनाला सांगितले. त्यापूर्वी एकदा भेटून तिच्यासोबत वेळ घालविण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्यासाठी शोभना तयार झाली. कथित रोमीने शोभनाला दिल्लीवरून ये-जा करण्याचे विमानाचे तिकीट पाठविले. रोमीने सांगितल्यानुसार ३० नोव्हेंबरच्या रात्री शोभना नागपूरला पोहोचली. रोमीने वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आपल्या नावावर खोली क्रमांक ३२६ बुक केली होती. रोमी विमानतळावरून शोभनाला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. रात्री झोपल्यानंतर रोमीने शोभनाचे दागिने, मोबाईल आणि रोख २८ हजार रुपये पळविले. दुसऱ्या दिवशी झोपेतून जागी झाल्यानंतर शोभनाला आपले साहित्य दिसले नाही. तिच्याजवळ रोमीचा पत्ताही नव्हता. त्यानंतर शोभनाला खरी माहिती समजली. तिने रोमीने पाठविलेल्या नागपूर-दिल्ली विमानाच्या तिकिटाची तपासणी केली असता ते सुद्धा बनावट असल्याचे समजले. शोभनाने प्रतापनगर पोलीस ठाण्यात रोमीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रोमीने ८ नोव्हेंबरला याच पद्धतीने गाझियाबाद येथील रहिवासी मोनल (४२) हिची रोख रक्कम आणि दागिन्यासह २.२५ लाख रुपये पळविले. मोनलची ओळखही शादी डॉट कॉमच्या माध्यमातून झाली होती. त्यावेळी रोमीने आपण रिंपी खंडुसा असल्याचे सांगितले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने मोनलला विमानाचे तिकीट देऊन नागपूरला बोलाविले होते. तिला एअरपोर्ट सेंटर पॉईंट हॉटेलच्या खोली क्रमांक ३०३ मध्ये थांबविले होते. रात्री मोनल झोपी गेल्यानंतर त्याने तिचे पैसे आणि दागिने पळविले. त्याने मोनलचे दोन एटीएमही चोरी केले. त्याने एका एटीएमवरून एक लाख आणि दुसऱ्या एटीएमवरून ४० हजार रुपये आपल्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केले. तरीसुद्धा पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. हा गुन्हा सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल आहे.
..........
बनावट आधारकार्डचा वापर
दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहे. त्याने आधारकार्डच्या साह्याने दोन्ही हॉटेलच्या खोल्या बुक केल्या होत्या. पहिल्या आधारकार्डवर रिंपी खंडुसा तर दुसऱ्या आधारकार्डवर रोमी अरोरा लिहिले होते. दोन्ही आधारकार्डचा क्रमांक एकच आहे. त्याने हॉटेलमध्ये आधारकार्डची झेरॉक्स दिली होती. आधारकार्ड पाहून त्याने नावासोबत छेडछाड केल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मूळ आधारकार्ड तपासले असते तर ते बनावट असल्याचे समजले असते.
दारू पाजल्यानंतर घडली घटना
दोन्ही घटना २० दिवसात घडल्यामुळे पोलीस आरोपीबाबत गंभीर झाले आहेत. तो महिलांना ज्या पद्धतीने फसवीत आहे ते गंभीर प्रकरण आहे. तो महिलांना दारू पिण्यासाठी आग्रह करतो. महिला नशेत असल्यामुळे त्याचे काम सोपे होते. या अवस्थेत तो काहीही करू शकतो. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस गंभीर नव्हते. परंतु दुसरी घटना घडल्यानंतर पोलिसही चक्रावले असून, त्याच्या गुन्हेगारीच्या पद्धतीवरून तो स्थानिक असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
.....................