CoronaVirus in Nagpur : आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती पॉझिटिव्ह, तीन रुग्णांची नोंद : रुग्णसंख्या ४१०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:11 AM2020-05-23T00:11:27+5:302020-05-23T00:16:29+5:30
शहरातील तापमानाने शुक्रवारी आपला उच्चांक गाठला असतानाही आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. आज केवळ तीनच रुग्णाची नोंद झाल्याने कामाचा ताण हलका झाला. रुग्णसंख्या ४१० झाली असून १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तापमानाने शुक्रवारी आपला उच्चांक गाठला असतानाही आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. आज केवळ तीनच रुग्णाची नोंद झाल्याने कामाचा ताण हलका झाला. रुग्णसंख्या ४१० झाली असून १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या युवतीला कोरोनाची लागण कुठून झाली, यावर शंका व्यक्त केली जात आहे. मेयो प्रशासनाला या युवतीवर उपचार करणाऱ्या दोन निवासी डॉक्टर, चार इन्टर्न डॉक्टर व १० परिचारिका असे १६ जणांना क्वारंटाईन केले आहे. विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बजेरिया येथील २१वर्षीय युवतीला मेयोमध्ये सोमवारी भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. तातडीच्या उपचारामुळे युवती मृत्यूच्या धोक्यातून बाहेर आली. परंतु तिला ताप व खोकला असल्याने गुरुवारी तिचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. रात्री पॉझिटिव्ह अहवाल येताच मेयो प्रशासन सतर्क झाले. रुग्णाला जेव्हा अतिदक्षता विभागात दाखल केले त्याच विभागात ५६ वर्षीय महिला उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे वॉर्डातच लागण झाली तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु मेयोच्या वरिष्ठ डॉक्टरांनुसार, मृत महिलेच्या खाटापासून रुग्णाची खाट बरीच लांब होती. शिवाय, युवती रुग्णालयात आल्यापासून तिला लक्षणेही होते. यामुळे तिला बाहेरूनच लागण झाली असावी, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉक्टर, इन्टर्नसह १६ जण क्वारंटाईन
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून मेयो प्रशासनाने तिच्यावर उपचार करणाऱ्यांना क्वारंटाईन केले. यात दोन निवासी डॉक्टर, चार इन्टर्न, १० परिचारिका अशा १६ जणांचा समावेश आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, येथील बहुसंख्य डॉक्टर व परिचारिका पीपीई किट घालूनच सेवा देतात. परंतु तरीही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
दोन भावंडासह तीन पॉझिटिव्ह
एम्समध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यात मोमीनपुरा येथील १७ व १८वर्षीय युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही भाऊ आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते ‘व्हीएनआयटी’मध्ये दाखल होते. या शिवाय, नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात मोमीनपुरा येथील २६ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला. या तिन्ही रुग्णांना लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते.
७३ वर्षीय महिलेने केली कोरोनावर मात
गेल्या दहा दिवसापासून मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाºया ७३ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली. मागील तीन दिवसात ताप व इतर लक्षणे नसल्याने व शरीरातील आॅक्सिजनची पातळी सामान्य असल्याने आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या रुग्णासोबतच मेडिकलने सात रुग्णांना सुटी दिली. यात २०, ३५, ३६, ६० वर्षीय महिला व ६५पुरुष आहे. हे सर्व रुग्ण मोमीनपुरा तकिया येथील रहिवासी आहेत तर एक चंद्रपूर येथील रुग्ण आहे. मेयोमधून मोमीनपुरा येथील ३५ वर्षीय तर सतरंजीपुरा येथील १३ वर्षाचा मुलगा व ४१ वर्षीय पुरुष बरे होऊन घरी परतले.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ६६
दैनिक तपासणी नमुने ४५२
दैनिक निगेटिव्ह नमुने ४४२
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४१०
नागपुरातील मृत्यू ०७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३२२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २३०९
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७३३
पीडित-४१०-दुरुस्त-३२२-मृत्यू-७