आपली बस मेट्रोकडे, सभागृहाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:29+5:302021-03-26T04:10:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील आपली बस मेट्रोकडे संचालनासाठी देण्याचा प्रस्ताव परिवहन समितीकडून मंजूर झाल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील आपली बस मेट्रोकडे संचालनासाठी देण्याचा प्रस्ताव परिवहन समितीकडून मंजूर झाल्यानंतर गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेतही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा प्रस्ताव आता राज्य शासनाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात येणार आहे. शासन मंजुरीनंतर आपली बस ही मेट्रोच्या ताब्यात जाणार आहे.
मनपाच्या शहर बससेवेमध्ये २३७ स्टँडर्ड डिझेल बस, ६ महिलांसाठी विशेष तेजस्विनी बस, १५० मिडी व ४५ मिनी बस अशा एकूण ४३८ बस आहेत. याशिवाय ४० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. अशा एकूण ४७८ बस महामेट्रोला देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहर वाहतूक व्यवस्था एकाच प्राधिकरणाकडे असावी, अशी भावना व्यक्त केली होती. शिवाय मेट्रोसह आपली बसचे संचालन देखील मेट्रोकडे असावे, असेही त्यांनी सांगितले होते. त्याअनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव तयार केला होता. मात्र, मेट्रोने आपली बसचे संचलन करण्याबाबत अद्याप मनपाला प्रस्ताव दिलेला नाही.
.............
साई संकुल बाधितांना पर्यायी जागा द्या
तरोडी खुर्द येथे ८७ एकरांवर होत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या ‘साई’च्या क्रीडा संकुलबाधितांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.