‘आपली बस’ पुन्हा थांबली

By admin | Published: March 30, 2017 02:33 AM2017-03-30T02:33:52+5:302017-03-30T02:33:52+5:30

महापालिकेने शहर बससेवेची सूत्रे हाती घेण्याला महिनाही झालेला नाही तोच स्टार बसच्या चालक-वाहकांची बुधवारी अचानक संप पुकारल्याने...

'Your bus' stopped again | ‘आपली बस’ पुन्हा थांबली

‘आपली बस’ पुन्हा थांबली

Next

वेतनाच्या प्रश्नावरून चालक-वाहक संपावर : विद्यार्थी व प्रवाशांचे हाल
नागपूर : महापालिकेने शहर बससेवेची सूत्रे हाती घेण्याला महिनाही झालेला नाही तोच स्टार बसच्या चालक-वाहकांची बुधवारी अचानक संप पुकारल्याने ‘आपली बस’ ची चाके थांबली. शहर बसची वाहतूक ठप्प पडल्याने दररोज बसचा प्रवास करणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले. दुसरीकडे संपाचा फायदा घेत आॅटो, ई-रिक्षा व व्हॅन चालकांनी मनमानी भाडे वसूल करून प्रवाशांना वेठीस धरले होते.
बुधवारी सायंकाळपर्यत संपावर तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळे रात्री उशिरापर्यत कर्मचारी कामावर परतले नव्हते. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या निर्देशानुसार पर्याय म्हणून तीन रेडबस आॅपरेटर बेरोजगार प्रशिक्षित युवकांना नोकरीवर ठेवू शकतात. तसेच आंदोलनातील सहभागी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा इशारा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. १ मार्चपासून महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत ‘आपली बस सेवा’ सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी २१० बसेस रस्त्यावर धावणार होत्या. सकाळी ७ वाजता पटवर्धन मैदानावरून ५२ बसेस, खापरी डेपोतून १८ बसेस नेहमीप्रमाणे निघाल्या होत्या.
परंतु हिंगणा डेपोतील वाहक पोहचले नव्हते. त्यामुळे येथून एकच बस बाहेर पडली. अर्ध्या तासात शहरात वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारल्याची माहिती पसरली. यासोबतच शहरातील सर्व बस वाहतूक ठप्प पडली.
वंश निमय यांच्याकडून शहर बस सेवा महापालिकेच्या परिवहन विभागाकडे १ मार्चला हस्तांतरीत करण्यात आली आहे. या बससेवेचे ‘आपली बस’ असे नामकरण करण्यात आले आहे. जुन्या ११२६ चालक-वाहकापैकी ८०० जणांना तीन आॅपरेटरने कामावर घेतले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची वर्तणूक, चौकशी सुरू असल्याने त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

प्रशिक्षित बेरोजगारांना ठेवणार
चालक-वाहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा चर्चा करण्यात आली आहे. मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अद्याप महिना झालेला नाही. अशा परिस्थितीत वेतनाला विलंब, कमी वेतन मिळत असल्याच्या मुद्यावरून आंदोलन करणे योग्य नाही. बुधवारी यावर तोडगा निघाला नाही तर प्रशिक्षित बेरोगार युवकांना कामावर ठेवण्याचे निर्देश नवीन आॅपरेटला देण्यात येतील.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका

Web Title: 'Your bus' stopped again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.