‘आपली बस’ पेटली
By admin | Published: May 8, 2017 02:08 AM2017-05-08T02:08:53+5:302017-05-08T02:08:53+5:30
नागपूर-वर्धा महामार्गावरून जात असलेल्या ‘आपली बस’मध्ये अचानक आग लागली. प्रसंगावधान साधून प्रवासी बाहेर उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
नागपूर-वर्धा महामार्गावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-वर्धा महामार्गावरून जात असलेल्या ‘आपली बस’मध्ये अचानक आग लागली. प्रसंगावधान साधून प्रवासी बाहेर उतरल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना मोहगाव परिसरात रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
महापालिकेतर्फे संचालित एमएच ३१/सीपी ६०७६ या क्रमांकाची आपली बस बुटीबोरीकडे जात होती. बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार मोहगावला पोहचल्यावर प्रवाशांना उग्र वासासह बसमध्ये धूर निघताना दिसला. प्रवाशांनी आरडाओरड केली. ती ऐकून चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि सर्व प्रवाशांना लगेच बाहेर उतरविले. पाहता-पाहता बसला आग लागली. बस पेटत असताना रस्त्याने ये-जा करणारेही थांबले. त्यामुळे नागपूर-वर्धा रोडवरील वाहतूकही ठप्प झाली होती. माहिती मिळताच बुटीबोरीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोहगावजवळ डीआरडीओचे डेपो आहे. तेथे तैनात असलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. या आगीच जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. बसच्या इंजिनजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बसशिवाय कुणाचेही नुकसान झालेले नाही.