तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:53 AM2019-08-17T10:53:17+5:302019-08-17T10:55:51+5:30

‘तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना’, असा थेट प्रश्न विचारत एक भावस्पर्शी लघुपट शासकीय विज्ञान संस्थेच्या फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.

Is your garbage is risky for someones life? | तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना?

तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना?

Next
ठळक मुद्देविज्ञान संस्था, फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी लघुपट सहा हजाराच्यावर लाईक्स

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या घरातून ओला, सुका व प्लास्टिक असा वेगवेगळा कचरा जमा होतो. मात्र हा तिन्ही प्रकारचा कचरा आपण एकाच ठिकाणी गोळा करून स्वच्छता कर्मचाऱ्यांजवळ देतो किंवा कुठेही फेकतो. त्याचे विलगीकरण करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे बहुतेक वेळा तशीच विल्हेवाट लावली जाते. कचऱ्याच्या ज्वलनातून विषारी वायूचे उत्सर्जन होत असते.
कचरा वेचणारे कामगार व मुले या विषारी कचऱ्यामुळे धोकादायक आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे ‘तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना’, असा थेट प्रश्न विचारत एक भावस्पर्शी लघुपट शासकीय विज्ञान संस्थेच्या फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. या लघुपटाला यु-ट्यूबवर चार दिवसात सहा हजाराच्यावर लाईक्स मिळाले आहेत.
एका रिपोर्टनुसार आपल्या देशात दररोज १५,३४२ टन कचरा प्रत्यक्ष बाहेर येतो. त्यातील ६००० टन कचऱ्याची उचल होत नाही. भारतासारख्या विकसनशील देशात अयोग्य कचरा व्यवस्थापन, पुरेशा स्वच्छतेबाबत अज्ञान यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. २०१७ पासून अशा धोकादायक आजारांपासून २२१ स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून यामध्ये मुलांची संख्या बरीच आहे. ही अवस्था या लघु चित्रपटामध्ये वास्तव रूपात सादर करण्यात आली आहे. फॉरेन्सिक सायन्सच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युटीच्या विद्यार्थ्यांनी ८.१२ मिनिटाचा हा लघुपट तयार केला आहे. विभागाचे सहायक प्राध्यापक व एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मालोजी भोसले यांच्या मार्गदर्शनात हा लघुपट तयार करण्यात आला.
निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय विद्यार्थ्यांनीच केला आहे. दिग्दर्शन मोक्षगण रेड्डी, एडिटींग शुभम राठोड व निर्मिती प्रा. भोसले यांची आहे. यामध्ये अंजली ईएस., शिवानी घोडके, सुश्रुत चाचरकर, पवन कल्याण, अश्विनी जायभाळ, संकेत जाधव, उमेश भोयर, मीनाक्षी अथुल्य यांनी भूमिका साकारल्या आहेत.
यु-ट्यूबवर ९ आॅगस्टला या लघुपटाचे लॉन्चिंग झाले विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.जी. आत्राम, डॉ. भाऊ दायदार, एनएसएसचे विद्यापीठ समन्वयक डॉ. केशव वाळके आदी उपस्थित होते.
अनेकांनी चित्रपटाच्या विषयावर कमेंट्सही केल्या आहेत. प्रा. भोसले म्हणाले, हा दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय असूनही फारशी जागृती नाही.
त्यामुळे हृदयस्पर्शी रुपात सादर करण्याचा प्रयत्न होता व तो पाहणाऱ्यांच्या हृदयाला भिडला याचा आनंद आहे. एनएसएसचे कार्य केवळ कॅम्प घेण्यापुरते मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक गोष्टी याने साध्य होतात, हेही यामाध्यमातून दाखविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Is your garbage is risky for someones life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.