आपले नागपूर, अस्वच्छ नागपूर
By admin | Published: May 5, 2017 02:30 AM2017-05-05T02:30:33+5:302017-05-05T02:30:33+5:30
‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ असे नागपूर महापालिकेचे ब्रीद आहे. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात ...
नंबर घसरला, २० वरुन १३७ वर
नागपूर : ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ असे नागपूर महापालिकेचे ब्रीद आहे. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरचा नंबर गत वर्षीच्या तुलनेत २० वरुन १३७ व्या क्रमांकावर घसरला आहे. स्वच्छता अभियानाच्या दिवशी सेल्फी काढणारे पालिका प्रशासन आणि नागपूरकरांसाठी मात्र केंद्र सरकारने दिलेला नंबर निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे ‘आपले नागपूर सुंदर की अस्वच्छ’ यावर मंथन करण्याची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.
शौचालयाच्या नुसत्या घोषणाच
नागपूर शहरात शौचालये उभारण्यासंदर्भात गेल्या पाच वर्षापासून महापालिका नुसत्या मोठमोठ्या घोषणाच करीत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्य आहे. अर्थसंकल्पातील तरतूद अखर्चित असल्याने प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पात यासाठीची तरतूद कमी कमी होत गेली. २०११ ते २०१४ या कालावधीत शौचालयावर ४१ कोटींचा खर्च केला जाणार होता परंतु प्रत्यक्षात हा खर्च करण्यात आलेला नाही. शहरात सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे. यामुळे महिलांची कुंचबणा होते. तसेच शहरातील ३० हजारांहून अधिक लोकांकडे शौचालये नाही. या दृष्टीने प्रभावी मोहीम राबविण्यात आलेली नाही.
९०० टन कचऱ्यावर प्रक्रियाच नाही
नागपूर शहरातून दररोज १००० ते ११०० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये तो साठविला जातो. काही वर्षांपूर्वी यातील ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती परंतु हंजर प्रकल्प बंद पडला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. परंतु आता जेमतेम १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित ९०० टन कचरा प्रक्रिया न करता भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होत नसल्याने या परिसरातील नागरिकांना त्रास होतो.
नंबर का घसरला?
इतर शहरांच्या तुलनेत नागपूर शहर स्वच्छ व सुंदर असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. परंतु यासोबतच स्वच्छेबाबतच्या निकषाविषयी प्रशासन गंभीर नाही. शौचालयाचे उद्दिष्ट देण्यात येते. परंतु त्याची पूर्तता केली जात नाही. सार्वजनिक शौचालयाचीही अशीच स्थिती आहे. या अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणे अपेक्षित आहे. परंतु वारंवार आवाहन केल्यानंतरही स्वच्छता अॅप डाऊ नलोड करण्याला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत जनजागृती करण्यातही प्रशासन कमी पडले. कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतही असाच प्रकार सुरू आहे. या बाबी केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आल्या. यामुळे नागपूरचा क्रमांक खाली आला असावा.
कचऱ्याचे विघटनच होत नाही
नागपूर शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यापैकी ६० टक्के कचऱ्याचे २४ तासात विघटन होणे शक्य आहे. मात्र आपल्याकडे जागृतीच नाही. घरांमधून निघणारा कचरा हा ओला-सुका असा मिश्र स्वरूपाचा असतो. त्यामुळे विघटन होऊ शकत नाही. तांत्रिक बाबींमध्येदेखील अडचणी येतात. विशेष म्हणजे नागरिकांमध्ये देखील तो दृष्टिकोन नाही. उगमाच्या ठिकाणीच कचरा विलग झाला तर घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मात्र कचरा विघटन होणारा कचरा विलग करण्यासंदर्भात नागरिक व प्रशासन कुणाकडूनदेखील पुढाकार घेण्यात येत नाही.
कर्मचाऱ्यांचा संख्या कमी
शहरातील कचरा संकलन व त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी कनक रिसोर्सेस कंपनीकडे देण्यात आली आहे. शहरातील स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. शहरातील स्वच्छतेसाठी ५ हजार ५०० तर कनक रिसोर्सेसचे १ हजार ५०० असे ७ हजार कर्मचारी आहेत. परंतु कनक कंपनीकडून योग्यप्रकारे कचऱ्याची उचल केली जात नाही. त्यामुळे शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
शहर स्वच्छतेवर भर द्यावा लागेल
नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरात विकासाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. विकास प्रकल्पामुळे सुरुवातीला स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. शहर स्वच्छ राहावे. यासाठी कचरा दररोज उचलला जातो. कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे लागतील. शहर स्वच्छतेवर अधिक भर द्यावा लागेल.
- नंदा जिचकार, महापौर