गडकरींच्या घरासमोर आपची निदर्शने ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:07 AM2021-07-18T04:07:01+5:302021-07-18T04:07:01+5:30
नागपूर : केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या एस.एस.सी.जी.डी. च्या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांना डावलण्यात आले, असा आरोप करीत आम आदमी ...
नागपूर : केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या एस.एस.सी.जी.डी. च्या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांना डावलण्यात आले, असा आरोप करीत आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीतर्फे शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
केवळ ५४ हजार उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांवर भारत सरकारने अन्याय केलेला आहे. तसेच गृहमंत्रालयाद्वारे केंद्रीय सशस्त्र दलात १ लाख पदे खाली असल्याबाबत जाहीर केले होते व त्याची प्रसिध्दी वृत्तपत्रात प्रकाशित सुद्धा करण्यात आली आहे. वास्तविक पाहता पात्र उमेदवारांना यापूर्वीच झालेल्या निवड प्रक्रियेतून डावलून परत नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात जाहीर करण्यात आलेली निवड प्रक्रिया ही पात्र उमेदवारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे यापूर्वीच पार पडलेल्या निवड प्रक्रियेत अर्जदार पात्र ठरले असल्यामुळे पुढील जाहीर करण्यात येणारी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आपचे विदर्भ युवा संयोजक पीयूष आखरे, नागपूर संयोजक गिरीश तितरमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. कृताल आकरे, हेमंत पांडे, ॲड. सौरभ दुबे, विशाल चौधरी, अक्षय दुपारे, स्वप्निल सोमकुंवर, पंकज मेश्राम, शुभम मोरे, योगेश पराते, प्रियंका तांबे, स्विटी इंदोरकर, पार्थ मीरे, अभय भोयर सुरेश लांजेवार आदींनी भाग घेतला.