नागपुरात नोकरीच्या नावावर लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:50 PM2018-03-05T23:50:09+5:302018-03-05T23:50:23+5:30
जलसंपदा विभागात अभियंत्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून विनायक धनराज भोयर (वय २८, रा. प्रगती कॉलनी, दिघोरी) याने भंडारा जिल्ह्यातील एका तरुणाचे एक लाख रुपये हडपले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जलसंपदा विभागात अभियंत्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून विनायक धनराज भोयर (वय २८, रा. प्रगती कॉलनी, दिघोरी) याने भंडारा जिल्ह्यातील एका तरुणाचे एक लाख रुपये हडपले.
दोन वर्षांपूर्वी आरोपी भोयरसोबत अमोल भगवानजी देशमूख (वय २२, रा. बेराड, पवनी, जि. भंडारा) याची ओळख झाली होती. अमोल याने अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे. तो रोजगाराच्या शोधात होता. २ जून २०१६ ला आरोपी भोयरने अमोलला थाप मारली. माझे वडील जलसंपदा विभागात नोकरीला असून, आपण कुणालाही नोकरी लावून देण्याची यावेळी त्याने बतावणी केली. तुला अभियंता म्हणून नोकरी पाहिजे का, असा प्रश्नही केला. त्यानंतर त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले. बदल्यात त्याला लघु सिंचन विभाग नागपूर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन अमोल संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे गेला असता ते पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अमोलने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी केली जात आहे.