कृषी कायद्यांविरोधात युवक काँग्रेसचे गडकरींच्या घरासमोर आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:14+5:302020-12-15T04:25:14+5:30
नागपूर : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात युवक काँग्रेसतर्फे सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. ...
नागपूर : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात युवक काँग्रेसतर्फे सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. त्यावेळी काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. नागपुरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी धरणे आंदोलन केले. त्याचवेळी युवक काँग्रेसने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी कृषी कायद्याविरोधात नारेबाजी करीत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तन्वीर विद्रोही, अनुराग भोयर, श्रीनिवास नालमवार, अक्षय हेटे, राहुल सिरिया, केतन रेवतकर, प्रणीत जांभुळे, पीयूष वाकुडीकर आदींसह मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.