कोरोनामुळे रोजीरोटी गेलेल्यांसाठी युवक काँग्रेस मैदानात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:46+5:302021-06-25T04:07:46+5:30
नागपूर : कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय बंद पडले. हातावर पोट असणाऱ्यांवर उपाशी मरण्याची वेळ आली. अशा रोजीरोटी ...
नागपूर : कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय बंद पडले. हातावर पोट असणाऱ्यांवर उपाशी मरण्याची वेळ आली. अशा रोजीरोटी गेलेल्या गरजूंच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे ‘कोरोना वॉरियर देशभरात मैदानात उतरले आहेत. अन्नधान्यासह, कोरोनाची औषधे ते उपलब्ध करून देत आहेत. ही मोहीम कठीण काळ संपेपर्यंत सुरू राहील, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.
श्रीनिवास हे बुधवारी रात्री बालाघाटचा दौरा आटोपून नागपुरात आले. यावेळी लोकमतशी बोलताना त्यांनी युवक काँग्रेस ही नेहमीच राष्ट्रीय संकटाच्या काळात सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून आल्याचे सांगितले. ते म्हणाले,काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवशी १९ जूनपासून गरजूंना मदतीची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातील प्रभारींवर जबाबदारी सोपविली आहे. ब्लॉक स्तरापर्यंत ‘कोरोना वॉरियर नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून
गरजूंना मदत करण्यासह स्मशानभूमीत काम करणाऱ्यांना पीपीई कीट देणे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना मदतीचा हात देणे सुरू आहे. विशेष म्हणजे या काळात युवक काँग्रेसने राजकीय कार्यक्रमांचे आयोजन बंद केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपा निवडणुकीत युवकांना तिकीट द्या
- पक्षासाठी झटणाऱ्या युवकांना जास्तीत जास्त उमेदवारी द्यावी, अशी मागणी नागपूर युवक काँग्रेसने बी.व्ही. श्रीनिवास यांच्याकडे केली. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, शहर अध्यक्ष तौसिफ खान यांनी या संबंधी निवेदन दिले. युवक कार्यकर्ते प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. मात्र, महापालिकेसह विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळत नाही. यावर नाराजी व्यक्त करीत याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.