संत्रा बागेचे ओलित करणे जीवावर बेतले; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 04:38 PM2023-03-25T16:38:39+5:302023-03-25T16:40:21+5:30

बेलाेना शिवारातील घटना

Youth dies due to electric shock while Irrigation of the orange groves | संत्रा बागेचे ओलित करणे जीवावर बेतले; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

संत्रा बागेचे ओलित करणे जीवावर बेतले; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

googlenewsNext

बेलाेना (नागपूर) : संत्रा बागेचे ओलित करताना शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप वारंवार बंद पडायचा. त्यामुळे तरुणाचे पेटीतील वीजप्रवाह तपासून पाहायला सुरुवात केली आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असून, ही घटना नरखेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलाेना शिवारात शुक्रवारी (दि. २४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.

युगल गजानन बारमासे (१७, रा. बेलोना, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. युगल त्याच्या आई व आजीसाेबत शेतात संत्र्याच्या बागेचे ओलित करण्यासाठी गेला हाेता. माेटरपंप सतत बंद हाेत असल्याने त्याने नेहमीप्रमाणे पेटीतील वीजप्रवाह तपासायला सुरुवात केली. त्यातच त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच शेजारच्या शेतकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. ताेपर्यंत त्याचा मृत्यू झाला हाेता.

माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक महेश बोथले, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अभिजित घोडे, शाखा अभियंता सलीम शेख यांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

विजेच्या कमी-अधिक दाबाला जबाबदार काेण?

युगल हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा हाेता. त्याला तीन बहिणी आहेत. ताे धार्मिक प्रवृत्तीचा हाेता. कृषिपंपांना दिली जाणारी वीज कमी दाबाची असते. त्यातच माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असून, दिवसा वीजपुरवठा सुरळीत असल्यास बागा व पीक जगवण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करतात. कृषिपंपाला पूर्ण दाबाच्या विजेचा पुरवठा केला असता तर माेटरपंप बंद झाला नसता. शिवाय, युगलचा जीव गेला नसता. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Youth dies due to electric shock while Irrigation of the orange groves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.