गणेश विसर्जन करताना तरुण वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:02 PM2018-09-25T23:02:26+5:302018-09-25T23:03:21+5:30
मित्र व इतरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघे गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खोल पाण्यात घेऊन गेले. त्यातच चौघेही मूर्तीसोबत प्रवाहात आले आणि वाहू लागले. त्यात तिघे कसेबसे बचावले. मात्र, एक जण कन्हान नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम (ता. कामठी) येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्र व इतरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघे गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खोल पाण्यात घेऊन गेले. त्यातच चौघेही मूर्तीसोबत प्रवाहात आले आणि वाहू लागले. त्यात तिघे कसेबसे बचावले. मात्र, एक जण कन्हान नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम (ता. कामठी) येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
विक्की ज्ञानेश्वर इंगोले (२७, रा. विनोबा भावे नगर, नागपूर) असे वाहून गेलेल्या तर श्याम धकाते (२८), भारत डोरलीकर (२८) व राजन आष्टनकर (२९) सर्व रा. विनोबा भावेनगर, नागपूर अशी थोडक्यात बचावलेल्या तरुणांची नावे आहेत. चौघेही नागपूर येथील विनोबा भावे नगरातील नागोबा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य आहेत. ते सोमवारी सायंकाळी बिना संगम येथे गणपती विसर्जनासाठी दोन ट्रॅक्टरने आले होते. त्यांच्यासोबत अंदाजे ५० ते ६० महिला, पुरुष व मुले होते.
दरम्यान, ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटामुळे पावसाळी वातावरण तयार झाले होते. त्यातच चौघेही गणपतीची सहा फूट उंच मूर्ती घेऊन कन्हान नदीच्या पात्रात विसर्जनासाठी उतरले. दुथडी भरून वाहणारी कन्हान नदी व पाण्याचा प्रवाह बघता अनेकांनी त्यांना खोल पाण्यात न जाण्याची वारंवार सूचना केली. परंतु, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघेही मूर्ती घेऊन आत गेले आणि प्रवाहात सापडले.
पाण्याच्या तेज प्रवाहामुळे संतुलन बिघडले व चौघेही मूर्तीसोबत गटांगळ्या खाऊ लागले. त्यातच भारतने एका हाताने राजनचे तर दुसऱ्या हाताने विक्कीचे केस पकडून त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला. परंतु, विक्की त्याच्या हातून निसटला. त्यातच श्यामने विक्कीला पकडण्याचा प्रयत्न कलो. पण, त्यालाही यश आले नाही. परिणामी, तिघेही पाण्याबाहेर आले आणि विक्की प्रवाहात वाहून गेला.
विक्की हा नागपूर येथील एका बॅण्डमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्यापश्चात आई, वडील, पत्नी व ११ महिन्याचा मुलगा आहे. मंगळवारी दिवसभर बिना संगम येथे नदीच्या काठावर विक्कीचे कुटुंबीय, नातेवाई व नागरिकांची गर्दी होती.
शोधकार्य सुरू
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार बाळासाहेब टेळे, खापरखेड्याचे ठाणेदार अशोक साखरकर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या नेतृत्वात सहा जणांच्या मदतीने ‘रोबोराईज बोट’द्वारे विक्कीचा शोध सुरू केला. मात्र, वृत्त लिहिस्तो त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. शोधकार्य मंगळवार सायंकाळपर्यत सुरूच होते.