धावत्या दुचाकीवरून काेसळला अन् कंटेनरच्या चाकाखाली आला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By सुनील चरपे | Published: October 1, 2022 04:44 PM2022-10-01T16:44:08+5:302022-10-01T16:46:10+5:30

गाेंडखैरी येथील घटना : घाबरलेल्या दुचाकीचालकाने काढला पळ

youth fell off the running bike and came under the wheel of the container dies | धावत्या दुचाकीवरून काेसळला अन् कंटेनरच्या चाकाखाली आला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

धावत्या दुचाकीवरून काेसळला अन् कंटेनरच्या चाकाखाली आला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Next

धामणा (नागपूर) : दुचाकीवर मागे बसून जात असलेला तरुण अचानक रोडवर कोसळला आणि मागून वेगात आलेल्या कंटेनरच्या चाकाखाली आला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घाबरलेल्या दुचाकीचालकाने दुचाकीसह तर कंटेनरचालकाने कंटेनर सोडून घटनास्थळाहून पळ काढला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरी येथील बस स्थानकाजवळ शुक्रवारी (दि. ३०) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.

सूरज नारायण खंडाते (२५, रा. मेटाउमरी, ता. हिंगणा, जिल्हा नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दुचाकीवर मागे बसून, नागपूरहून कोंढाळी मार्गे १४ मैलच्या दिशेने जात होता. ती दुचाकी गोंडखैरी (ता. कळमेश्वर) येथील  बस स्थानकाजवळ येताच सूरज रोडवर कोसळला. ही बाबत लक्षात येताच घाबरलेला दुचाकीचालक दुचाकीसह लगेच पळून गेला. तर, सुरज स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच मागून वेगात आलेल्या एमएच-४०/बीजी-३०१४ क्रमांकाच्या कंटेनरच्या चाकाखाली आला.

नागरिकांनी त्याला गोंडखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी गर्दी होत असल्याचे पाहून चालकाने कंटेनर घटनास्थळी सोडून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोदविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज टिकले करीत आहेत.

सीम कार्डवरून पटली ओळख

या अपघातातील मृत कुणाच्याही ओळखीचा नव्हता. शिवाय, अपघातात त्याचा मोबाईल फोनही फुटला. त्यातच बळीराजा फाऊंडेशनच्या एका कार्यकर्त्याने फुटलेल्या मोबाईलमधून सीम काढून स्वत:च्या मोबाईलमध्ये टाकून त्यातील कॉन्टॅक्ट लिस्ट तपासली. त्यातील एका क्रमांकावर कॉल केल्यानंतर तो नंबर सूरज खंडाते याचा असल्याचे स्पष्ट झाले आणि मृताची ओळख पटली.

Web Title: youth fell off the running bike and came under the wheel of the container dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.