मेट्रोमध्ये पदभरतीच्या नावाखाली दलालांकडून युवकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:54+5:302021-06-11T04:06:54+5:30

नागपूर : महामेट्रोत नोकरी लावून देण्याच्या भूलथापा देऊन फसवणुकीचे प्रकार सध्या नागपुरात घडत आहेत. अशा अफवांपासून नागरिक आणि विशेषत: ...

Youth fraud by brokers in the name of recruitment in Metro | मेट्रोमध्ये पदभरतीच्या नावाखाली दलालांकडून युवकांची फसवणूक

मेट्रोमध्ये पदभरतीच्या नावाखाली दलालांकडून युवकांची फसवणूक

Next

नागपूर : महामेट्रोत नोकरी लावून देण्याच्या भूलथापा देऊन फसवणुकीचे प्रकार सध्या नागपुरात घडत आहेत. अशा अफवांपासून नागरिक आणि विशेषत: युवक-युवतींनी सावध राहण्याचे आवाहन महामेट्रो प्रशासनाने केले आहे.

भरतीची शहानिशा करण्यासाठी एका युवकाने लोकमतशी संपर्क साधला. त्याच्याकडे टीसीच्या भरतीसाठी एका दलालाने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. सदर प्रतिनिधीने मेट्रो कार्यालयात संपर्क साधला असता कोणत्याही प्रकारची जाहिरात महामेट्रोने दिली नसल्याची माहिती मिळाली. संबंधित युवकाने सत्यस्थिती पुढे आणल्याबद्दल लोकमतचे आभार मानले. महामेट्रोमध्ये पदभरती होणार असल्याची अफवा अनेकदा उठली आहे. त्यात तथ्य नसले तरीही नोकरी लावून देण्याच्या भूलथापा देणाऱ्या दलालांकडून बेरोजगार युवकांची आर्थिक पिळवणूक होते. नोकरी न लागल्याने युवक दलालाकडे पैसे परतीची मागणी करतात, तेव्हा दलाल गायब होतात. तथाकथित दलाल मोठ्या राजकीय नेत्यांसोबत हितसंबंध असल्याचे दर्शवितो. त्यामुळे युवक त्याच्या भूलथापांना बळी पडतात.

या संदर्भात महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे म्हणाले, महामेट्रोमध्ये भरती होते तेव्हा सर्वप्रथम शहरातील वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात येते. याशिवाय संपूर्ण माहिती मेट्रोच्या संकेतस्थळावर टाकली जाते. याची शहानिशा युवक-युवतींनी करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून महामेट्रो नागपूर प्रकल्पात पदभरती होत असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विविध पदांकरिता भरती होत असल्याचा दावादेखील या जाहिरातीच्या माध्यमाने करण्यात येत आहे. पण अशी कुठलीही जाहिरात महामेट्रो, नागपूरने प्रसिद्ध केली नसून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जाहिरातीशी महामेट्रोचा काहीही संबंध नाही. कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीमार्फत महामेट्रोची पदभरती होत नाही, असे हळवे यांनी स्पष्ट केले.

मेट्रोत नोकरी लावून देतो, असे म्हणत फसवणुकीचे प्रकार याआधीही नागपुरात घडले असून त्या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली आहे. नोकरी देण्यासंबंधीचे कुठलेही अधिकार महामेट्रोने कुठल्याही त्रयस्थाला दिले नसून कुणी तसा दावा करत असेल तर ते सपशेल चुकीचे असल्याची खात्री सर्वांनी बाळगावी. या संदर्भात मेट्रोच्या अधिकृत वेबसाईटवर वा कार्यालयात संपर्क साधता येईल.

Web Title: Youth fraud by brokers in the name of recruitment in Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.