पुण्याच्या तरुणाने केली नागपूर रेल्वेस्थानकावर एकाची हत्या
By नरेश डोंगरे | Updated: June 9, 2023 13:52 IST2023-06-09T13:51:01+5:302023-06-09T13:52:28+5:30
सीसीटीव्हीवरूनच पोलिसांनी आरोपीचा माग काढला

पुण्याच्या तरुणाने केली नागपूर रेल्वेस्थानकावर एकाची हत्या
नागपूर : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पुण्यातील एका आरोपीने छत्तीसगडमधील तरुणाच्या डोक्यात सिमेंटची फळी घालून त्याची हत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जीतेंद्र उर्फ टोपी (रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव दिनसागर उर्फ दिनेश धोंडिबा सदाफुले (वय ३४) असून तो पुण्यातील वारजे माळवाडी, रामनगर येथील रहिवासी आहे.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे पोलिसांचे पथक येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ४-५ वर गस्त करीत असताना त्यांना एका तरुणाच मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मृताच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांनी लगेच वरिष्ठांना ही माहिती कळविली. त्यानंतर घटना समजून घेण्यासाठी फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
आरोपी तरुण मृतकाला सिमेंटच्या फळीने ठेचत असल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीवरूनच पोलिसांनी आरोपीचा माग काढला असता तो ईटारसी लाईनच्या टोकावर फलाटाच्या आडोशाला दडून दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने हत्येची कबुली दिली. त्याने आपले नाव आणि पत्ता सांगून किरकोळ वादातून हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान, मृतकाचे पूर्ण नाव काय, तो काय करीत होता. हत्येचे नेमके कारण कोणते, या संबंधीचा सविस्तर खुलासा वृत्त लिहिस्तोवर झाला नव्हता.