Corona Virus in Nagpur; विदर्भातील तरुण सर्वाधिक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:59 AM2020-04-07T11:59:40+5:302020-04-07T12:00:07+5:30
कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत असले तरी आतापर्यंत विदर्भात आढळून आलेल्या २८ कोरोनाबाधितांपैकी केवळ तीनच रुग्ण ६० वर्षांवरील आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण तरुण गटातील आहेत.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत असले तरी आतापर्यंत विदर्भात आढळून आलेल्या २८ कोरोनाबाधितांपैकी केवळ तीनच रुग्ण ६० वर्षांवरील आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण तरुण गटातील आहेत. यांची संख्या २० आहे, तर लहान मुलांमधील रुग्णांची संख्या पाच आहे.
राज्यात मुंबई, पुणे, सांगली व ठाण्यात ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या तुलनेत विदर्भात फार कमी आहेत. विदर्भात पुढील १४ दिवस एकही रुग्ण आढळून आला नाही तर आपण या संकटातून बाहेर पडू, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण नागपुरात ११ मार्च रोजी आढळून आला. तेव्हापासून ते ४ एप्रिलपर्यंत नागपुरात १७ रुग्ण आढळून आले आहेत. यात ३० ते ५० वर्षे वयोगटातील १३ तर ६० वर्षांवरील एक तर ११ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये तीन रुग्ण आहेत. नागपूरशिवाय विदर्भात केवळ बुलडाणा, अमरावती, वाशिम व गोंदिया या चारच जिल्ह्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली आहे. येथे आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले असून एका ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यूची नोंद आहे. गोंदिया, वाशिम व अमरावती जिल्ह्यात एक-एक रुग्ण आढळून आले आहेत. यात वाशिम जिल्ह्यात ६० वर्षे वयोगटातील एक तर अमरावती जिल्ह्यात ५० वर्षे वयोटातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या दोघांचे नमुने मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले आहेत. एकूणच विदर्भात कोरोना रुग्णाची वयोगटानुसार स्थिती पाहता आतापर्यंत एक ते १७ वर्षे वयोगटात पाच, १८ ते ३० वर्षे वयोगटात एक, ३० ते ५० वर्षे वयोगटात १९ तर ६० वर्षांवरील वयोगटात तीन रुग्ण आढळून आले आहेत.