बालगुन्हेगारांनी केली युवकाची हत्या : नागपूर एमआयडीसीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:47 PM2019-07-24T23:47:11+5:302019-07-24T23:49:32+5:30
क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली. पोलिसांनी या हत्येचे सूत्रधार दोन अल्पवयीन आणि त्याचा साथीदार गणेश ऊर्फ कऱ्या विक्की दांडेकर (२४) रा. गिट्टीखदान याला अटक केली आहे. संदीप हिराचंद बावनकर (२४) रा. राजीवनगर असे मृताचे नाव आहे.
संदीप खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी आहेत. संदीपला कही दिवसांपासून मिरगी येत होती. यामुळे त्याने काम सोडले होते. या खुनाचे सूत्रधार दोन बालगुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही खून आणि इतर गुन्हे दाखल आहेत. दुसरा अल्पवयीन सुद्धा घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी आहे. काही दिवसांपूर्वी घरफोडी करणाऱ्या बालगुन्हेगारासोबत संदीपचा वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार संदीप आपल्या गर्लफ्रेण्ड्ससोबत बाईकने जात होता. त्याचवेळी आरोपीने तिला पाहून टोमणा मारला. संदीपने त्याला फटकारत समज दिली. यामुळे आरोपीला प्रचंड राग आला. त्याने संदीपचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने ही गोष्ट आपल्या दुसऱ्या अल्पवयीन साथीदारास सांगितली.
मंगळवारी संदीपचा मित्र प्रणयचा वाढदिवस होता. यात संदीप आणि त्याचे इतर मित्रही गेले होते. जिथे वाढदिवस साजरा केला जात होता. त्याच्या समोरूनच आरोपी जात होता. कुठल्या तरी गोष्टीवरून संदीप आणि त्याच्या मित्रांशी वाद झाला. यामुळे त्याला आणखीनच राग आला. तो त्याचा दुसरा अल्पवयीन साथीदार, गणेश दांडेकर व इतर साथीदार काही वेळानंतर पुन्हा तिथे आले. संदीप त्यांना सापडला. ते संदीपला वाद सोडवण्याच्या बहाण्याने गळ्यात हात टाकून राजीवनगरच्या टेकडीवर घेऊन गेले. तिथे त्याला मारहाण केली व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाले. खूप वेळ होऊनही संदीप परत न आल्याने त्याचे साथीदार चिंतेत पडले. ते टेकडी परिसरात गेले. तेव्हा त्यांना हत्या झाल्याचे समजले. त्यांनी एमआयडीसी पोलिसांनी सूचना दिली. तसेच संदीपला रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात निघाले. तेव्हा तीन आरोपी दुचाकीने संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांना पाहून ते पळू लागले. पोलिसांनी त्यांना पकडले. विचारपूस केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.
आरोपी गणेशसुद्धा चोरीच्या प्रकरणात सामील आहे. त्याची सासूरवाडी राजीवनगरात आहे. त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी आली होती. पत्नीला भेटायला गणेश आला होता. अल्पवयीन आरोपीसोबत त्याची जुनी मैत्री आहे. त्यांच्या सांगण्यावरून तो घटनास्थळी गेला होता.
संदीपचे मित्र आरोपींची संख्या जास्त असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वाढदिवसाच्या कार्यक्रमातून परत आल्यावर संदीप आपल्या मित्रांसोबत राजीवनगर बस स्टँडजवळ उभा होता. त्याचवेळी दहा-बारा युवक आले. ते संदीपच्या मित्रांना मारहाण करू लागले. त्यांना धमकावत तेथून जाण्यास सांगितले. आरोपींची संख्या अधिक असल्याने त्याचे मित्र तेथून निघून गेले. यानंतर संदीपला टेकडी परिसरात नेऊन त्याची हत्या केली.
पाच तासात दोन खून
पाच तासात खुनाच्या दोन घटना घडल्याने पोलीसही हादरले आहेत. दोन्ही खुन क्षुल्लक वादातून झालेत. खुनासारख्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी अधिकाऱ्यांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.