क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या
By admin | Published: June 20, 2017 01:45 AM2017-06-20T01:45:22+5:302017-06-20T01:45:22+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या हत्येत झाले. आशिष केशवराव कांबळे (वय ३७, रा. खामला) असे मृत तरुणाचे नाव आहे.
कार पार्किंगचा वाद : गोळीबार चौकातील घटना, दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या हत्येत झाले. आशिष केशवराव कांबळे (वय ३७, रा. खामला) असे मृत तरुणाचे नाव आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास ही घटना घडली.
रुतुराज नंदकिशोर भादविकर (वय ३२, रा. विशाखा लक्ष्मी केदार कॉम्पलेक्स, जेल रोड, नाशिक) आणि आशिष केशवराव कांबळे हे दोघे रविवारी रात्री गोळीबार चौकाजवळच्या ओम शक्ती भोजनालयात जेवण करायला गेले होते. जेवण झाल्यानंतर ते आपली झायलो कार बाहेर काढत असताना कारसमोर उभा असलेल्या अतुल सुदाराम सदावर्ते (वय २९, रा. गोळीबार चौक) आणि स्वप्नील शरदराव महाजन (वय २९, रा. नेहरू पुतळ्याजवळ, इतवारी) या दोघांनी पार्किंगच्या मुद्यावरून रुतुराज आणि आशिषसोबत वाद सुरू केला.
पाहता पाहता हाणामारी सुरू झाली आणि आरोपी सदावर्ते तसेच महाजनने आशिष कांबळेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
बाजूच्या काहींनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून आशिषला सोडविले. त्याला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरने आशिषला मृत घोषित केले.
या प्रकरणाची माहिती कळताच तहसीलचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी आरोपी सदावर्ते आणि महाजनला अटक केली.
कुटुंबीयांचा आक्रोश
आशिषला आईवडील, पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा, दोन बहिणी आहेत. आशिष उच्चशिक्षित होता. पूर्वी तो एल अॅन्ड टी मध्ये मुंबईला कार्यरत होता. तेथून नोकरी सोडून तो नागपुरात आला. काही दिवसांपासून तो रोजगाराच्या शोधात होता.
काही दिवसांपूर्वीच त्याला सीसीटीव्ही लावणाऱ्या आणि त्याची देखभाल करणाऱ्या कंपनीकडून रोजगारासंबंधीची नियुक्ती मिळाली होती. त्या संबंधाने कंपनीशी संबंधित मित्रांसोबत रविवारी रात्री त्याची गोळीबार चौकात बैठक होती. बैठक संपल्यानंतर ते तिकडेच जेवायला गेले. आजूबाजूला जागा नसल्यामुळे आशिषने आपली कार भोजनालयाच्या बाजूला एका गल्लीसमोर उभी केली. गल्लीत आरोपींनी दुचाकी ठेवली होती. कारमुळे ती अडकून पडल्याने आरोपी संतापले.ते कारवाल्यांची वाट बघत उभे होते. जेवण करून बाहेर निघाल्यानंतर आशिष आणि रुतूराजसोबत त्यांनी वाद सुरू केला. अश्लील शिवीगाळ करतानाच मारहाणही सुरू केली. आशिषला उचलून खाली आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान आरडाओरड ऐकून सावजीमधील काही जण मदतीला धावल्याने आरोपी पळून गेले. आशिषच्या हत्येचे वृत्त कळताच खामल्यात तीव्र शोककळा पसरली. त्याच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश तीव्र झाला आहे.
सावजी अन पोलीस
शहरातील ठिकठिकाणी पहाटेपर्यंत चालणारे सावजी हॉटेल आणि त्यांना भागीदारांसारखी मदत करणारे पोलीस सर्वत्र चर्चेचा विषय आहे. महामार्गावरील हॉटेल्समुळे सर्वसामान्यांना त्रास होत नसला तरी शहराच्या मध्यभागी असलेल्या सावजी हॉटेल्समुळे त्या भागातील रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. सावजीत सर्रास दारूचा वापर होतो. हे दारुडे बाजूच्या घरांच्या भिंतीवर लघुशंका करतात. घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात. भांडण, हाणामाऱ्या करतात. कुणाच्याही घरासमोर वाहने लावतात. इतवारी, तहसील, पाचपावली, जरीपटका आदी भागातील काही सावजींची हॉटेल त्या भागातील नागरिकांसाठी प्रचंड कुचंबणेचा विषय ठरले आहेत. पोलिसांकडे तक्रारी करूनही त्याचा फायदा होत नाही. तक्रारी वाढल्या म्हणून पोलीस हप्ता वाढवून घेतात. अनेकदा एकमेकांसमोर आडवी, तिडवी वाहने लावल्याने वाद होतात. रविवारी रात्री झालेली आशिष कांबळेची हत्या तशातीलच प्रकार आहे.