तरुणाईला दिशा देणारे व्यासपीठ राहिले नाही
By admin | Published: February 15, 2016 03:03 AM2016-02-15T03:03:42+5:302016-02-15T03:03:42+5:30
१९७२ मध्येसुद्धा दुष्काळ पडला होता. तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी तरुणांना कॉल दिला होता.
वसंत आणि करुणा फुटाणे यांची खंत : नैसर्गिक शेतीच तारू शकते
नागपूर : १९७२ मध्येसुद्धा दुष्काळ पडला होता. तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी तरुणांना कॉल दिला होता. त्यावेळी संपूर्ण तरुणाईने दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्यात जुंपून घेतले होते. आजही राज्यात दुष्काळ पडला आहे. परंतु असा कॉल देणारी कुणी व्यक्ती, तरुणाईला दिशा देणारे कुठलेही व्यासपीठ राहिलेले नाही. त्या काळी हे व्यासपीठ क्र ांतिकारक ठरायचे, आज मात्र व्यासपीठच उरले नाही, अशी खंत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे वसंत व करुणा फुटाणे यांनी व्यक्त केली.
प्रयास सेवांकुर या संस्थेतर्फे आयोजित ‘आम्ही बिघडलो! तुम्ही बी घडाना!’ या कार्यक्रमांतर्गत प्रगट मुलाखतीत फुटाणे दाम्पत्याने संवाद साधला. चिटणवीस सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान विभागाची पदवी घेतल्यानंतर आयुष्यात पदवीचा उपयोग करायचा नाही, असा विचार करून पदवी प्रमाणपत्र जाळणारे रवाळ्याचे वसंत फुटाणे आणि शाळेत जाऊन कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेता प्रत्यक्ष काम करता करता व शेती करून अनुभवाद्वारे कृषी वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र तसेच भाषेचे शिक्षण घेतलेल्या त्यांच्या पत्नी करुणा यांनी आपली अलग वाट धरली. वसंतभाऊ यांनी बाबा आमटे यांच्या छावणीतून आपले सेवाकार्य सुरू केले. पुढे आणीबाणीच्या आंदोलनासह विविध चळवळीत सहभाग घेतला. त्यांच्या पत्नी करुणा यांनाही लहानपणापासून आई-वडिलांमुळे विनोबांचा सहवास लाभल्याने सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाले आणि त्यांनीही ते पुढे चालविले. या दोघांचाही १९८१ साली विवाह झाला आणि दोघेही निसर्गप्रेमी दाम्पत्य आपल्या रवाळा या गावी आले आणि निसर्ग शेतीचा नवा मार्ग तयार केला. चंगळवादी संस्कृतीला प्रत्यक्ष स्वत:च्या जगण्याद्वारे पर्याय देण्याचा आदर्श त्यांनी समाजात उभा केला.
मुलाखतीदरम्यान या दाम्पत्याने विविध चळवळी आणि शेतीसंदर्भातील अनुभव सांगितले. दैनंदिन जीवनात चैनीच्या गरजांवर नियंत्रण ठेवून, नैसर्गिक किंवा सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य केले आणि त्यांना योग्य भाव दिला गेला तर शेती आणि शेतकरी जगेल आणि नवीन पिढी शेतीकडे आकर्षित होईल, असे मत फुटाणे दाम्पत्याने व्यक्त केले. ८० च्या दशकात शेतीचे सर्व प्रश्न आणि समस्या समजून घेत सेंद्रीय शेती आणि नैसर्गिक शेतीकडे लक्ष दिले. पारंपरिक बियाण्यांचा उपयोग करून शेती केली. ज्या ऋतूमध्ये जे लागेल आणि त्याला पोषक वातावरण असेल अशा वस्तूंची शेतीच्या माध्यमातून निर्मिती केली. काही दिवस स्वत:साठी त्याचा उपयोग केला आणि त्यानंतर गावासाठी उपयोग केला.
गावातील लोक आकर्षित होऊ लागल्याने गाव त्यादृष्टीने तयार करण्याची जनजागृती केली. सर्व भाज्या वर्षभर मिळाल्या पाहिजे असे नाही, जे पिकले त्याचा आनंद घेता आला पाहिजे. शेती ही बाजारासाठी नाही तर आपली आणि स्वत:ची गरज भागविण्यासाठी केली पाहिजे. शेतीशिवाय आज जगू शकत नाही त्यामुळे शेती सक्षम होण्याची गरज आहे. त्याला पर्याय उपलब्ध नाही. शेती आहे तर जीवन आहे. विषाणूयुक्त अन्न मिळत असेल तर सेंद्रीय शेती करणाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपण भाव करीत असलो तरी शेतकऱ्यांसाठी मात्र भाव करू नका. शेती जगली तर शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तर सामान्य माणूस जगणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना सहकार्य करा, असे आवाहन फुटाणे दाम्पत्यानी केले.
रवाळ्यात काम करताना निसर्ग शेतीचे प्रयोग सुरू केले. पारंपरिक बियाणे, सेंद्रीय शेती, पाणलोट, वृक्ष शेती, फळबाग, गोपालन, बायोगॅस, मातीचे सारवलेले घर, अशी निसर्गाला अनुकूल जीवनशैली त्यांनी निवडली. गेल्या ३० वर्षांपासून ते जीवन जगत आहे. शेतीसोबतच विषयुक्त अन्न, मुलांचे व तरुणांचे शिबिर, दारुबंदी व व्यसनमुक्ती, वाचनालय, समूह जीवनाची असे विविध प्रकल्प त्यांनी चालविले. त्यांच्या सहवासात निसर्गाच्या प्रेमात पडण्याच्या मोहापासून कोणी वाचवू शकत नाही.(प्रतिनिधी)