नववर्षाच्या स्वागतासाठी उपराजधानीतील तरुणाई सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:12 PM2019-12-27T12:12:43+5:302019-12-27T12:13:41+5:30
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची सजावट करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे पाच दिवस दिवस बाकी राहिले आहेत. नुकतेच ख्रिसमसचे सेलिब्रेशन करून आता सगळी तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत कशा प्रकारे करायचे या तयारीला लागली आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची सजावट करण्यात येत आहे.
आऊटिंग, सिनेमा, हॉटेलिंग याबरोबरच पब किंवा डिस्कोथेकमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्याचे प्रमाण काही दिवसात निश्चितच वाढले आहे. शहरातील वाढलेली पबची आणि तेथे सेलिब्रेशनसाठी जाणाऱ्यांच्या वाढलेल्या संख्येवरून उत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदललेल्या दिसत आहेत. नववर्ष-२०२० च्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असून यानिमित्ताने हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्लब, ढाबे, रिसोर्टच्या सजावटीची तयारी सुरू झाली आहे.
नवीन वर्षाचे स्वागत डान्स आणि मस्तीने करण्यासाठी म्युझिक बँड, डीजे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अनेक हॉटेल्समध्ये करण्यात येणार आहे. डान्स फ्लोअरची खास व्यवस्था केली आहे.
शहरातील काही हॉटेल्सने दाम्पत्यासाठी विशेष पॅकेज जारी केले आहेत. हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. काही हॉटेल्सने ३१ च्या रात्री निवासासह ब्रेकफास्ट आणि लंचकरिता फ्री आॅफरची देऊ केली आहे. न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी हॉटेल्समध्ये खोल्यांचे बुकिंग सुरू झाले आहे. काही मोठ्या हॉटेल्सने सार्वजनिक सेलिब्रेशनचे आयोजन केलेले नाही.
मद्यासह सेलिब्रेशनची व्यवस्था करणाºया हॉटेल्सला एका दिवसासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जास्त शुल्क भरावे लागते. आयोजनासाठी अनेक विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. त्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल करण्यात येतो.
जास्त शुल्क देण्यास ग्राहक तयार होत नाहीत. त्यामुळे मोठ्या हॉटेल्सचा न्यू इयर सेलिब्रेशन भव्य प्रमाणात साजरा करण्याकडे रस दिसून येत नाही. लोक शहराबाहेर रिसोर्टवर जाण्यास इच्छुक असल्यामुळे नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या हॉटेल्समध्ये गर्दी दिसत नाही.
आता लोकांची जंगल रिसोर्टकडे गर्दी वाढत आहे. नागपूरलगत अनेक भागात रिसोर्ट विकसित करण्यात आले आहेत. मोठ्या हॉटेल्सपेक्षा हे रिसोर्ट स्वस्त पडतात. त्यामुळे अनेक कुटुंबीयांचा नववर्षासाठी या रिसोर्टकडे ओढा वाढला आहे.