नागपूर जिल्ह्यात तरुणांनी वाचविले पुरात अडकलेल्या वृद्धेचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:26 PM2019-07-02T12:26:53+5:302019-07-02T12:27:37+5:30
नजीकच्या पोटा येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी कन्हान नदीवर गेली. कपडे धूत असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ती पुरात अडकली. मात्र, काही तरुणांनी जीवाची पर्वा न करताना पुरात शिरून त्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले.
अरुण महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नजीकच्या पोटा येथील रहिवासी ७० वर्षीय वृद्धा कपडे धुण्यासाठी कन्हान नदीवर गेली. कपडे धूत असताना पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने ती पुरात अडकली. मात्र, काही तरुणांनी जीवाची पर्वा न करताना पुरात शिरून त्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले.
सुमित्रा असोले, रा. पोटा, ता. सावनेर या नेहमीप्रमाणे गावालगत वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सोबत त्यांनी १२ वर्षीय नातीलादेखील नेले होते. नात तिच्याजवळ खेळत होती. त्या पात्रात मध्यभागी असलेल्या खड्ड्याकाठी बसून कपडे धूत होत्या. त्यावेळी नदीचे पात्र कोरडे होते.
पाऊस न बरसता काही वेळातच पात्रात पाणी वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी नातीला काठावर जाण्याची सूचना केली. सर्व साहित्य घेऊन त्या पात्राबाहेर पडत असताना पाण्याची पातळी वाढली. त्यांना पुरातून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने त्या मध्येच थांबल्या. त्याचवेळी अंकित यादव, विनोद भारद्वाज, चेतन भोंडेकर, प्रफुल मांगुळकर, चेतन नगराळे आदी तरुण या परिसरात फिरायला आले होते; शिवाय सुजित सूर्यवंशी व आकाश साहानी हे दोघेही सदर दृश्य बघत होते.
त्यातच अंकित यादव आणि विनोद भारद्वाज या दोघांनी लगेच पाण्यात उडी मारली आणि वृद्धेपर्यंत पोहोचले. त्या दोघांनीही तिला हात पकडून सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच नदी दुथडी भरून वाहायला लागली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तिला व तिच्या नातीला पोटा येथे घरी पोहोचवूनही दिले. नदीकाठी असलेले इतर तरुण मात्र नुसतेच बघत होते. परंतु, या दोघांव्यतिरिक्त कुणीही तिच्या मदतीला धावले नाही. या हिमती कार्यामुळे दोघांचेही कौतुक होत आहे. कन्हान नदीचा उगम मध्य प्रदेशात असून, उगमाकडे जोरदार पाऊस बरसल्याने नदीला पूर आला होता.