नागपूरनजीकच्या खापरखेड्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:34 PM2017-12-16T22:34:38+5:302017-12-16T22:40:41+5:30
जुन्या वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारच्यासमोश शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : जुन्या वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारच्यासमोश शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत तरुण हा एका खुनातील आरोपी असून, त्याच्यावर गोळ्या झाडणारा आरोपीदेखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आकाश पानपत्ते (२७, रा. वॉर्ड क्रमांक - १, खापरखेडा, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश हा त्याच्या मित्रांसोबत खापरखेडा - कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बारमध्ये बसला होता. तो रात्री ८ वाजताच्या सुमारास बारमधून बाहेर पडताच आरोपीने त्याच्या डोक्यावर तब्बल तीन गोळ्या झाडल्या आणि तिथून लगेच पळून गेला. आकाशचा मित्र नीलेश डेहरिया याने आकाशला लगेच खापरखेडा येथील डॉ. पवार यांच्या हॉस्पिटन्लमध्ये नेले. डॉ. पवार यांच्या सूचनेवरून त्याला मानकापूर (नागपूर) येथील अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. हा प्रकार बारच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आकाशवर सूरज कावळे, रा. वॉर्ड क्रमांक - २, खापरखेडा, ता. सावनेर याने गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी वेकोलिच्या सिल्लेवाडा येथील कार्यालयात मेहताब खान याचा खून करण्यात आला होता. आकाश हा मेहताब खान याच्या खुनातील एक आरोपी होती. आकाशचा खून मेहताबच्या समर्थकांनी केला असावा, असा संशय व्यक्त केला जात असून, पोलीस त्याही दिशेने तपास करीत आहेत. सूरज कावळे याच्याकडे संशयित म्हणून बघितले जात असून, तोही सराईत गुन्हेगार असल्याची तसेच त्याचे आकाशसोबत जुने वैमनस्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.