नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित थरार; धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 03:10 PM2023-01-02T15:10:32+5:302023-01-02T15:18:25+5:30
पाचपावलीतील घटना, चौघांना अटक
नागपूर : उपराजधानीत नव्या वर्षाची सुरुवात खुनाच्या घटनेने झाली आहे. पाचपावलीच्या वैशालीनगर सिमेंट रोडवर रविवारी दिवसाढवळ्या एका युवकाचा खून करण्यात आल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.
राजेश विनोद मेश्राम (२५, समतानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर मनोज नारायण गुप्ता (३०, कपिलनगर), शुभम उर्फ दादू हिरामण डोंगरे (३०,संतानगर), विपिन उर्फ जॅकी रामपाल विश्वकर्मा (२७, बाबादीपनगर), पीयुष भैसारे (२२, रा. वैशालीनगर) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून इमरान वहिद मलिक (ताजनगर) हा आरोपी अद्यापही फरार आहे. राजेश मेश्राम वाहन चालक होता. त्याची मनोजशी जुनी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. मनोज गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो राजेशचा काटा काढण्याच्या तयारीत होता. राजेशने त्याला गांभीर्याने घेतले नाही.
रविवारी सकाळी मनोज आपल्या साथीदारांसह शस्त्र घेऊन राजेशच्या घरी पोहोचला. कुटुंबीयांनी राजेश कामावर गेल्याचे त्याला सांगितले. मनोजने राजेशचा भाऊ राजू मेश्रामची पत्नी मनप्रीतला राजेशचा खून करण्याची धमकी दिली. त्यानंतर मनोज आणि त्याचे साथीदार निघून गेले. राजेश सकाळी १०.३० वाजता बाईकवर स्वार होऊन वैशालीनगर सिमेंट रोडवर पोहोचला. तेथे बाईकवरून उतरून तो खर्रा घेत होता. तेवढ्यात मनोज आपल्या साथीदारांसोबत कार क्रमांक एम. एच. ४९, ए. एस-८७६० ने तेथे पोहोचला. त्यांनी राजेशला घेराव घातला. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. घटनास्थळी लहान मुले खेळत होते.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुले आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्यामुळे ते पळत सुटले. दरम्यान राजेशही जीव वाचविण्यासाठी जवळच्या एका घराच्या गच्चीवर गेला. हे पाहून हल्लेखोर पळून गेले. नागरिकांनी या घटनेची पाचपावली पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी राजेशला रुग्णालयात पोहोचविले. त्यावेळी त्याचा श्वास सुरू होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा जीव गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपी आणि त्यांची कार दिसली.
चार दिवसात झाले दोन खून
पाचपावली ठाण्याच्या परिसरात २५ डिसेंबरला शंकर कोत्तुलवारचा खून करण्यात आला होता. त्याच्या चार दिवसानंतर दुसरी घटना घडली. पाचपावलीतील पोलिस धान्य माफिया सोनु, टेकाचा सट्टेबाज सलमान आणि सुपारी गुटख्याची माहिती घेण्यात व्यस्त आहेत. दोन महिन्यांपूर्वी डीबी पथकाचे मुख्य आणि त्यांचे कर्मचारी गुटखा-तंबाखूवर कारवाई करीत होते. परंतु गुन्हेगारी रोखण्यात ते प्राथमिकता देत नव्हते. अचानक डीबी पथकाच्या हृदय परिवर्तनामुळे वरिष्ठ अधिकारीही चिंतेत आहेत. कोत्तुलवारच्या खुनातही सुरुवातीला एक आरोपी तथा पगंत उडविण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पाच आरोपींना अटक करून वैमनस्यातून खून झाल्याचे सांगण्यात आले.