दारूच्या नशेत तरुणाचा दगडाने ठेचून खून; नागपूरच्या यशोधरानगर परिसरातील थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 11:22 AM2022-09-29T11:22:12+5:302022-09-29T11:31:37+5:30
दारूच्या नशेत झालेल्या वादातून ई-रिक्षाचालकाकडून तरुणाची हत्या
नागपूर : दारू प्यायल्यानंतर झालेल्या वादातून एका ई-रिक्षाचालकाने तरुणाचा बळी घेतला. घटनेनंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. हा प्रकार यशोधरा पोलीस ठाण्यांतर्गत वीटभट्टी परिसरात घडला. प्रकाश उर्फ राजू लल्लू धकाते (२८, विनोबा भावे नगर) असे मृत तरुणाचे नाव असून, सतीश पांडुरंग मुळे (२७) हा आरोपी आहे.
सतीश हा ई-रिक्षा चालक असून, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर मारहाणीचा गुन्हाही दाखल आहे. मृत राजू हा बेरोजगार आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता हे दोघेही वीटभट्टी चौकाजवळील मैदानात दारू पीत होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. राजूने सतीशच्या आईला शिवीगाळ केली. यामुळे तो चिडला. दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी त्याने राजूच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने वार करून गंभीर जखमी केले. त्यावेळी घटनास्थळी कोणीही नव्हते. यानंतर सतीशने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तोपर्यंत राजू जिवंत होता. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले.
चौकशीनंतर दिली नेमकी माहिती
सुरुवातीच्या चौकशीत सतीशने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत राजूला ओळखण्यास नकार दिला. राजू त्याला वाटेत भेटला होता. वनदेवीनगर चौकाच्या अगोदरच तो ई-रिक्षातून उतरला व त्याने २० रुपयांऐवजी १० रुपये भाडे दिले. भांडण झाल्याने तो राजूसोबत घटनास्थळी गेला व तिथे त्याच्यावर हल्ला झाला. नशा उतरल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सतीशने आईला शिवीगाळ केल्याने खून केल्याची कबुली दिली.