नागपुरात स्थानिक रोजगारासाठी युवक अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:12 PM2020-06-18T23:12:00+5:302020-06-18T23:15:22+5:30

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे आवाहनही केले. पण स्थानिकांनी रोजगारासाठी पाठ फिरविल्याचे चित्र सर्वच एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Youth uneager for local employment in Nagpur | नागपुरात स्थानिक रोजगारासाठी युवक अनुत्सुक

नागपुरात स्थानिक रोजगारासाठी युवक अनुत्सुक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कारखाने तब्बल दोन महिने बंद होते. त्यानंतर मेच्या २० तारखेपासून उद्योग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी देणे सुरू केले. परप्रांतीय कामगार आणि मजूर स्वगृही परतल्याने सुरू झालेल्या कारखान्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे आवाहनही केले. पण स्थानिकांनी रोजगारासाठी पाठ फिरविल्याचे चित्र सर्वच एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आता कारखान्यांमध्ये ५० ते ६० टक्के उत्पादन होत आहे. दोन महिन्यात कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीतील उद्योगांमध्ये ८ ते १० हजार कुशल आणि अकुशल कामगारांची गरज भासणार आहे. त्यातच आयटीआय आणि कौशल्य शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगाराची मोठी संधी आहे.
एका उद्योजकाने सांगितले की, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी असतानाही त्यांच्यात उत्साह दिसत नाही. उद्योजकांची नेहमीच परप्रांतीयांना पसंती राहिली आहे. कारण अन्य राज्यातील कुशल आणि अकुशल कामगार एमआयडीसीच्या लगतच्या वस्त्यांमध्ये एकत्रित राहतात आणि वेळेवर कामगार येतात. आठवडी सुटीव्यतिरिक्त ते अन्य दिवशी सुटी घेत नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत नाही. ही भावना स्थानिक युवकांमध्ये नसते. शहरातून बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीमध्ये येताना त्यांना अनेक अडचणी आहेत. वाहतुकीसाठी त्यांना जास्त खर्च येतो. याच कारणामुळे फार कमी युवक एमआयडीसीमध्ये काम करण्यास तयार होतात. कोविड-१९ च्या धर्तीवर आता युवकांनी मानसिकता बदलली पाहिजे.

युवकांना महा स्वयम पोर्टलमध्ये नोंदणी करावी
रोजगारासाठी शिक्षित आणि अशिक्षित युवकांनी शासनाच्या महा स्वयम पोर्टलमध्ये त्यांना हव्या असलेल्या कामाची नोंदणी करावी. त्यानुसार युवकांना खासगी कंपन्यांमध्ये कामासाठी मॅसेज पाठविले जातात. उद्योजक आणि युवक यांचा थेट संवाद होऊन युवकांना रोजगार मिळतो. २०१४ मध्ये सुरू झालेल्या पोर्टलवर दोन लाख युवकांची नोंद आहे. कोविडच्या काळात एक हजार युवकांची नोंद झाली आहे. अनेकांना पोर्टलद्वारे रोजगार मिळाला आहे.
प्रभाकर हरडे, सहायक आयुक्त, राज्य शासन कौशल्य विकास.

आठ हजार कामगारांची गरज भासणार
पुढील दोन महिन्यात कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आठ हजार कामगारांची गरज उद्योगांमध्ये राहणार आहे. याकरिता युवकांनी तयार राहावे. रोजगारासाठी महा स्वयम पोर्टलचा फायदा घ्यावा. कोविड-१९ मुळे युवकांना रोजगाराची संधी चालून आली आहे.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

Web Title: Youth uneager for local employment in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.