विदर्भातील युवांना सैन्यात सुवर्णसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:15 AM2018-08-22T01:15:09+5:302018-08-22T01:18:27+5:30
भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर मुख्यालयाचे भरती संचालक कर्नल आर.एम. नेगी यांनी पत्रकार परिषदेतून केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर मुख्यालयाचे भरती संचालक कर्नल आर.एम. नेगी यांनी पत्रकार परिषदेतून केले.
नागपूर मुख्यालयातर्फे दरवर्षी सेनेत भरती होऊन देशाची सेवा करण्याची संधी युवकांना दिली जाते. यावेळी सेनेने ही भरती प्रक्रिया अमरावती जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू क्रीडा स्टेडियम येथे आयोजित केली आहे. २३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. कर्नल नेगी म्हणाले की, भारतीय सेनेत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. विदर्भातील युवकांनीसुद्धा यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. बुलडाणा सोडून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील युवक यात सहभागी होऊ शकतात. सात कॅटेगरीसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. साडेसतरा वयोगटाच्या वरील युवकांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे. युवकांनी दलाल अथवा अन्य कुणाचे सहकार्य घेऊ नये. किमान १० टप्प्यात भरती प्रक्रिया होणार आहे. गेल्या वर्षी भरती प्रक्रियेत ४० ते ४५ हजार युवक सहभागी झाले होते. यावर्षीही त्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नेगी यांनी व्यक्त केली. यावेळी डिफेन्स पीआरओ ग्रुप कॅप्टन बी.बी. पांडे उपस्थित होते.
२४ आॅगस्टपासून आॅनलाईन नोंदणी
सेना भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २४ आॅगस्टपासून युवकांना वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करायचे आहे. यात पदनिहाय शैक्षणिक गुणवत्ता, वयाची मर्यादा व आवश्यक कागदपत्राची माहिती मिळणार आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत ही वेबसाईट सुरू राहणार आहे.
नशेचे पदार्थ सेवन करू नये
देशात झालेल्या काही भरती प्रक्रियेत युवकांनी शारीरिक चाचणीत क्षमता वाढविण्यासाठी युवक मादक पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेपूर्वी युवकांची चाचणी होणार आहे. यात युवक आढळल्यास त्याला भरती प्रक्रियेच्या बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी मादक पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहनही नेगी यांनी केले.