नागपुरातील गिट्टीखदानमध्ये तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 07:56 PM2019-05-24T19:56:15+5:302019-05-24T21:39:46+5:30
दारूच्या अड्डयावर क्षुल्लक कारणावरून गिट्टीखदानमधील गुंडांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. राहुल विठ्ठल सलामे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ दद्या भीमराव गजभिये (वय २१), आशिष सुनील सोमकुवर (वय २१) आणि रोहित राजू मरकाम (वय २०, तिघेही रा. हजारी पहाड, गिट्टीखदान) या तिघांना अटक केली. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या अड्डयावर क्षुल्लक कारणावरून गिट्टीखदानमधील गुंडांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. राहुल विठ्ठल सलामे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ दद्या भीमराव गजभिये (वय २१), आशिष सुनील सोमकुवर (वय २१) आणि रोहित राजू मरकाम (वय २०, तिघेही रा. हजारी पहाड, गिट्टीखदान) या तिघांना अटक केली. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.
मृत राहुल गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध हत्या, हाणामारी तसेच लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याने अलिकडे गुन्हेगारीपासून फारकत घेतली होती. तो मोलमजुरी करून पत्नी पूजा तसेच मोहन (वय ८ वर्षे) आणि आयुष (वय ६ वर्षे) सह हजारी पहाड परिसरात राहत होता. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम आटोपून राहुल सायंकाळी घरी आला आणि काही वेळेनंतर बाहेर गेला. त्याला दारूचे व्यसन आहे. हजारीपहाड मध्ये एका अवैध दारूच्या गुत्त्यावर राहुल गेला. मतमोजणीचा दिवस असल्याने सर्वत्र दारूबंदी होती. त्यामुळे हजारीपहाडमधील दारूच्या अवैध गुत्यावर मोठी गर्दी होती. पल्लीच्या दारूच्या अड्ड्यावर कुख्यात गुंड दद्दया, आशिष, रोहित आणि त्याचे साथीदार होते. राहुलचे त्यांच्यासोबत जुने वैमनस्य आहे. राहुल दारूच्या अड्ड्यावर गेल्यानंतर त्यांची एकमेकांवर नजर पडताच दद्दया आणि त्याच्या साथीदाराने त्याला धक्का मारला. राहुलने एकाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वाद वाढला. दद्दया आणि त्याच्या साथीदारांनी राहुलला बाजूला ओढत नेले आणिं शस्त्राचे घाव घातल्यानंतर त्याला दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.
कुणीच धावले नाही मदतीला
यावेळी दारूच्या अड्ड्यावर मोठी गर्दी होती. बाजूच्या रस्त्यावरही वर्दळ होती. मात्र, आरोपींची गुन्हेगारी वृत्ती बघता कुणीच राहुलच्या मदतीला धावले नाही. एकाने ही माहिती राहुलची पत्नी पूजा हिला दिली. पूजाने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. तिने लगेच पोलिसांना कळविले. राहुलला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पूजा सलामेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. रात्रभर धावपळ करून पोलिसांनी एका अल्पवयीन साथीदारासह दद्दया, आशिष आणि रोहितला ताब्यात घेतले.
पल्ल्याच्या भूमिकेची चौकशी
या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार दद्या कुख्यात गुंड असून, त्याच्यावर यापूर्वीही हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तो आणि अवैध दारूचा अड्डा चालविणारा पल्ल्या या दोघांचेही राहुलसोबत पटत नव्हते. त्यामुळेच त्यांनी राहुलचा काटा काढल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पल्ल्याची काय भूमिका आहे, त्याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.