फुटाळ्यावर अवतरली तरुणाई
By admin | Published: April 20, 2015 02:09 AM2015-04-20T02:09:57+5:302015-04-20T02:09:57+5:30
एरवी रविवारच्या सकाळी फुटाळा चौपाटी परिसरात मोजक्याच लोकांची गर्दी असते. परंतु यंदाचा रविवार काहिसा वेगळा होता.
नागपूर : एरवी रविवारच्या सकाळी फुटाळा चौपाटी परिसरात मोजक्याच लोकांची गर्दी असते. परंतु यंदाचा रविवार काहिसा वेगळा होता. सकाळच्या सुमारास फुटाळ्यावर तरुणाईसोबतच नागपूरकरांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता.
ं‘लोकमत’तर्फे रविवारी फुटाळा चौपाटी येथे ‘धम्माल गल्ली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘टीओआय’ प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर राखताना ‘लोकमत’ने हा कार्यक्रम रद्द केला. याची सूचनादेखील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. तथापि नेहमीच्या तुलनेत रविवारी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. बहुतांश जण ‘एन्जॉय’ व धम्माल करण्याच्या उद्देशाने आले होते. अनेकांच्या हातात विविध खेळाचे साहित्य, गिटार, ड्रम यांसारखी वाद्ये दिसून येत होती. तरुणाईसह सुमारे दीड ते दोन हजार आबालवृद्ध यावेळी जमा झाले होते. यातून हे स्पष्ट होते की नागरिकांना रोजच्या दगदगीतून धम्माल-मस्तीचे विरंगुळ्याचे क्षण मिळावे यासाठी व्यासपीठाची आवश्यकता असते. रविवारी याची फुटाळा चौपाटीवर प्रचितीच आली. येथे सकाळपासूनच विविध संस्था आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे गट येऊ लागले होते. त्यांचा प्रत्येकाचा उद्देश ‘एन्जॉयमेंट’ हाच होता.(प्रतिनिधी)