युवकाचा मृत्यू, निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:36 PM2018-08-22T23:36:43+5:302018-08-22T23:38:27+5:30
करंट लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगणा पोलिसांनी साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : करंट लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगणा पोलिसांनी साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. ६ मे रोजी जुना बाभुळखडा येथील रहिवासी ३० वर्षीय प्रवीण ऊर्फ सोनू वाघे हा हिंगणा खडकी येथील शीलाबाई उईके यांच्या घरी गेला होता. शीलाबाई यांच्या घरी लग्नसमारंभ होता. यादरम्यान सोनू कूलरमध्ये पाणी टाकत होता. कूलर सुरू असल्याने त्याला विजेचा धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासात अर्थिंग नसल्याने कूलर शॉर्ट झाल्याचे आढळून आले. या आधारावर शीलाबाई यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
विजेचा धक्का लागून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. योगेश्वर मौर्य रा. भरतवाडा असे मृताचे नाव आहे. तो बुधवारी सकाळी वेल्डिंग मशीनचा वायर प्लगमध्ये लावत असताना त्याला विजेचा धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अपघातातील जखमीचा मृत्यू
रस्ता अपघातात जखमी झलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इस्तारी मुलुंडे (५७) रा. सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर काटोल रोड असे मृताचे नाव आहे. गेल्या १६ आॅगस्ट रोजी गिट्टीखदान चौकात अपघातात ते जखमी झाले होते. रामदासपेठ येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
इतवारी येथे अनियंत्रित कारने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला धडक दिली. यात ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ओमप्रकाश मोतीलाल रोडे रा. मस्कासाथ पोलीस चौकी असे मृताचे नाव आहे. मस्कासाथ मार्गावरील मेमन जमात भवनाजवळ कार क्रमांक एमएच २०/एजी/८८३ च्या चलकाने त्यांना धडक देऊन जखमी केले. मेयो रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तहसील पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
जखमी व्यक्तीचा मृत्यू
घरच्या पायऱ्यांवरून पडून जखमी झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. केशव लोखंडे रा. रामबाग असे मृताचे नाव आहे. ते घरातील पायऱ्या उतरताना पडून जखमी झाले होते. त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.