देशभर सायकलने फिरत शाकाहाराचा संदेश देण्याचा तरुणाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:40 AM2018-07-30T10:40:11+5:302018-07-30T10:41:31+5:30
रोहित इंगळे हे नाव नागपूर शहरासाठी अनोळखी आहे. परंतु रोहित आॅक्टोबर २०१७ पासून वॅगन इंडिया मुव्हमेंट मिशनला घेऊन देशभरात सायकलने फिरत आहेत.
ललिता टाटा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोहित इंगळे हे नाव नागपूर शहरासाठी अनोळखी आहे. परंतु रोहित आॅक्टोबर २०१७ पासून वॅगन इंडिया मुव्हमेंट मिशनला घेऊन देशभरात सायकलने फिरत आहेत. देशात शाकाहाराचा संदेश देण्याचे कार्य ते करीत आहेत. नागरिकांनी मांसाहार सोडून शाकाहार सुरु करावा यासाठी ते आपल्या अभियानातून जनजागृती करीत आहेत.
रोहित इंगळे यांनी आतापर्यंत ७५०० किलोमीटरचे अंतर कापून ते नागपुरात पोहोचले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या अभियानाशी निगडित अनुभव सांगितले. आपण हे अभियान का सुरू केले हेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. रोहितने सांगितले, ते दुबईत एका हॉटेलमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. दरम्यान त्यांनी एक लेख वाचला. या लेखात ‘वॅगन’ हा शब्द वाचला. या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्यांनी पूर्ण लेख वाचला. या लेखात एक ओळ अशी होती की जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करीत असाल तर मांस खाऊ नका. ही ओळ वाचल्यानंतर ही ओळ खरी असल्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्या दिवसापासून त्यांनी मांस खाणे बंद केले. एवढेच नव्हे तर शाकाहाराप्रति नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे असल्याचा विचार त्यांच्या मनात आला. या विचारातून ते नोकरी सोडून मुंबईला आपल्या घरी परतले. तेथे एक गट तयार केला. पशुंना वाचविण्याच्या दिशेने त्यांनी काम सुरू केले. काही वर्षानंतर हा प्रयत्न कमी असल्याचे त्यांना वाटले. अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींबाबत त्यांनी पुस्तकातून वाचन सुरू केले.
एका पुस्तकात आॅस्ट्रेलियात एका व्यक्तीबाबत त्यांनी वाचले. त्यांनी ५ हजार किलोमीटरचे अंतर कापून जनजागृती केली होती. त्या पासून रोहितला प्रेरणा मिळाली. रोहितने सांगितले की, त्यांनी सायकलवर फिरून देशभरात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी खूप तयारी केली.
या राज्यांमध्ये दिला संदेश
प्रवास सुरू केल्यानंतर रोहितने आजपर्यंत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू व काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्यात जनजागृती केली. तेथून ते नागपुरात पोहोचले. नागपूरात व्हीजन नावाचा ग्रुप तयार केला आहे. यापुढे दक्षिणेकडील राज्यात जाण्याचा मनोदय रोहितने व्यक्त केला.